जिल्हा बँक आघाडीवर तर राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:28+5:30
खरीप हंगामाला सुरूवात होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. रोवणीसाठी शेतकºयांना मजुरांची मजुरी, खते घेण्यासाठी पैशाची गरज आहे. यासाठीच शेतकरी बँकांमधून पीक कर्जाची उचल करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांना खरीप हंगामात पैशाची अडचण भासू नये यासाठी त्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश नाबार्ड आणि शासनाने दिले आहे. यंदा खरीप हंगामात राष्ट्रीययकृत, जिल्हा आणि ग्रामीण बँकांना एकूण २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी आत्तापर्यंत या तिन्ही बँकांनी एकूण १८६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने आघाडी कायम ठेवली असून राष्ट्रीयकृत बँका अद्यापही पिछाडीवरच आहे.
खरीप हंगामाला सुरूवात होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. रोवणीसाठी शेतकºयांना मजुरांची मजुरी, खते घेण्यासाठी पैशाची गरज आहे. यासाठीच शेतकरी बँकांमधून पीक कर्जाची उचल करीत आहे. जिल्हा बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया किचकट नसल्याने शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल ही याच बँकेतून करतात.
जिल्हा बँकेने आतापर्यंत एकूण १२७ कोटी ११ लाख रुपयांचे, ग्रामीण बँकांनी २२ कोटी ९५ लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ३० लाख ७९ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तिन्ही बँकेच्या कर्ज वाटपाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्हा बँक ९३ टक्के, ग्रामीण बँक ८१.७५ टक्के, राष्ट्रीयकृत बँकांनी २९.३४ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. यंदा या तिन्ही बँकांना एकूण २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून ७ जुलैपर्यंत १८६ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३७ हजार ८५१ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली आहे. खरिपातील पीक कर्ज वाटप हे आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येते. राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँका पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठतात का याकडे लक्ष लागले आहे.