जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:46 PM2018-07-17T23:46:27+5:302018-07-17T23:46:54+5:30

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते.

District collapsed | जिल्ह्यात कोसळधार

जिल्ह्यात कोसळधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते. पावसाची कोसळधार कायम असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका बसल्याने अर्जुनी मोरगाव व आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एकूण ४४ कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. मुसळधार पावसामुळे ४९० घरे व गोठे पडून नुकसान झाले. मागील चौवीस तासात जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून पावसाची स्थिती पाहुन पुजारीटोला धरणाचे ८ तर धापेवाडा धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले होते. पावसामुळे जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक मार्ग बंद झाले होते त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत आहेत. तर नदी आणि नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही गावांचा संर्पक तालुका आणि जिल्ह्याशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तुटला होता. पुलावरील पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आहे. सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद आमगाव तालुक्यात १९१.८५ मिमी झाली. तर त्या पाठोपाठ सालेकसा तालुक्यात १७३.६२, गोरेगाव १२८.३३ मिमी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात ९५.२० मि.मी.पावसाची नोंद झाली. एकूण ३३ महसूल मंडळापैकी २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील तीन चार वर्षांत प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे बोलल्या जाते. दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी दोन तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेली रोवणी वाहून गेली.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे आणि पाईप वाहून गेल्याने आर्थिक फटका बसला. पावसामुळे घरे आणि गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रस्त्यावर वाहनांच्या रांगा
जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पांगोली नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने गोरेगाव-सोनी-ठाणा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर आमगाव-देवरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने आमगाव-देवरी, सालेकसा-देवरी, आमगाव-कामठा, आमगाव-वडेगाव, बिजेपार-साखरीटोला, बिजेपार- अंजोरा, बोरकन्हार, बिजेपार-सालेकसा-गांधीटोला, सालेकसा-राजनांदगाव मार्ग बंद होता. कमरगाव नदीवरील पुलावर पाणी असल्याने मुंडीपार-तेढा या गावाचा संर्पक तुटला होता. आमगाव-शिवणी, आमगाव-चिरचाळबांध, आमगाव-तिगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सुदैवाने अनर्थ टळला
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. आमगाव-देवरी मार्गावरील नाल्यावरुन पाणी वाहत असताना निमगाव येथील एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पुलावरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ट्रॅक्टर नाल्याच्या काठावर अडकले. दरम्यान उपस्थित नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान साधल्याने मोठा अनर्थ टळला. दोन ट्रक्टरच्या मदतीने नाल्यावर अडकलेले ट्रक्टर बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणी
गोंदिया नगर परिषदेने शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफ सफाई न केल्याने मुसळधार पावसामुळे नाल्या चोख होवून सुर्याटोला, शास्त्रीवार्ड परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने उपाय योजना सुरू केल्याची माहिती आहे.
पन्नासावर गावांचा संपर्क तुटला
मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते. तर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला धरणाचे ८ तर धापेवाडा प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदी आणि नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० वर गावांचा जिल्हा आणि तालुक्याशी संपर्क तुटला होता.
रस्त्यावरच अंत्यसंस्कार
गोंदिया येथील पांगोली नदी परिसरात स्मशानभूमी आहे. मात्र पांगोली नदीला पूर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद होता. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानघाटावर जाता आले नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्काराचा विधी आटोपावा लागला.

Web Title: District collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.