जिल्हाधिकाऱ्यांनी दिली घारपिंडे कुटुंबीयांना हिंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:59+5:302021-07-13T04:06:59+5:30
गोरेगाव : तालुक्यातील सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या घरावर वीज कोसळून घर जळाल्याची घटना (दि. १०) शनिवारी घडली. ...
गोरेगाव : तालुक्यातील सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या घरावर वीज कोसळून घर जळाल्याची घटना (दि. १०) शनिवारी घडली. जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रविवारी (दि. ११) घारपिंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून घारपिंडे कुटुंबाला धीर दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार सचिन गोसावी, नायब तहसीलदार रहांगडाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, निरीक्षण अधिकारी नीलेश देठे, तलाठी हस्तरेखा बोरकर, पुरवठा निरीक्षक समीर मिर्झा उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी देवचंद घारपिंडे यांच्या कुटुंबाशी संवाद साधन संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दैनंदिनी कामासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू गोळा करून तात्पुरती मदत म्हणून रेशन किट भेट दिली. घारपिंडे कुटुंबाचे वीज पडून घर जळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची तात्पुरती राहण्याची सोय प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी खवले म्हणाले, एक व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून घारपिंडे कुटुंबाची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी गावातील इच्छुक नागरिकांनी मदत करावी व माझ्याही नावाचा त्यात समावेश करावा, तसेच सामाजिक संघटन एन. जी. ओ. यांनीसुद्धा पुढाकार घेऊन या कुटुंबीयांची मदत करावी. प्रशासनाकडून जेव्हा मदत येईल. तेव्हा या कुटुंबीयांची मदत निश्चितच करण्यात येईल. परंतु आजघडीला घारपिंडे कुटुंबाची मदत करणे हे आपले सामाजिक दायित्व आहे, असे सांगितले. जिल्हाधिकारी खासगी मदत म्हणून आपल्याकडून रोख स्वरूपात पाच हजार रुपयांची तत्काळ मदत केली.