जिल्हाधिकाऱ्यांनी केली बीजीडब्ल्यू रुग्णालयाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:18 AM2018-06-17T00:18:57+5:302018-06-17T00:18:57+5:30
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय (बीजीडब्ल्यू) व रक्तपेढी संदर्भातील तक्रारींमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याची ओरड वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय (बीजीडब्ल्यू) व रक्तपेढी संदर्भातील तक्रारींमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याची ओरड वाढली आहे. याच सर्व गोष्टींची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी या रुग्णालयाला व रक्तपेढीला आकस्मिक भेट देवून तेथील सोयी सुविधांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही, यादी दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी बलकवडे यांनी भेटी दरम्यान संपूर्ण बीजीडब्ल्यू रुग्णालयाची व परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ब्लड बँकेला भेट देवून तेथील सोयी सुविधांचा आढवा घेतला. या रुग्णालयात दररोज किती रुग्ण दाखल होतात, रुग्णालयात रुग्णांसाठी किती खाटांची व्यवस्था आहे. त्यांना औषधांचे योग्य वितरण केले जाते किंवा नाही याची माहिती घेतली. तसेच दाखल असलेल्या रुग्णाकडून त्यांनी माहिती घेतली. या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पातुरकर, बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सायास केंदे्र व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी बलकवडे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे आठदिवसांपूर्वीच लोकमतने जिल्ह्यातील बालमृत्यूची बातमी प्रकाशीत केली होती. यात बीजीडब्ल्यू रूग्णालयात सर्वाधिक बालमृत्यू झाल्याची बाब पुढे आणली. रुग्णालयाच्या भेटी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांना विविध प्रश्न केल्याची माहिती आहे. तर अधिकाऱ्यांनी सुध्दा त्यांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण १४ टक्के असून गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूचा दर १०.५० टक्के आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाय योजना करून बालमृत्यूचा दर कमी करण्याचे निर्देश बलकवडे यांनी दिले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पाण्याची व्यवस्था व प्रसाधानगृहांची पाहणी केली. तसेच स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले.
दर आठवड्याला घेणार बैठक
जिल्हाधिकारी बलकवडे यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी रुग्णालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बीजीडब्ल्यू रुग्णालयातील बाल व माता मृत्यूचा दर कमी करण्याच्या विषयावर या बैठकीत बरेच मंथन करण्यात आले. रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी काय करता येईल याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सूचना मागविल्या. रुग्णालयाला निधी कसा उपलब्ध करुन देता येईल, पालकमंत्र्यांची काही मदत घेता येईल का? यावर मंथन करण्यात आले. याच बैठकीत दर आठवड्याला बीजीडब्ल्यू समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेतला.