परराज्यातील प्रवासासाठी जिल्ह्याकडे एकही रातराणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:30+5:302021-08-01T04:26:30+5:30
कपिल केकत गोंदिया : राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या एसटीवर प्रवाशांचा सर्वाधिक भरवसा असून प्रवासासाठी राज्यात एसटीलाच पसंती दिली जाते. ...
कपिल केकत
गोंदिया : राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या एसटीवर प्रवाशांचा सर्वाधिक भरवसा असून प्रवासासाठी राज्यात एसटीलाच पसंती दिली जाते. प्रवाशांचा हा विश्वास जपून ठेवण्यासाठी महामंडळाकडूनही नवनवीन प्रयोग व प्रवासी सुविधांची पूर्तता केली जात आहे. यातूनच लालपरीच्या सोबतीला ‘शिवशाही’ व ‘रातराणी’ची जोड देण्यात आली आहे. गोंदिया आगाराकडे शिवशाही असतानाच संपूर्ण विभागात गोंदिया आगाराकडेच फक्त एक रातराणी देण्यात आली आहे. गोंदिया आगाराची ही रातराणी गोंदिया-नांदेड धावते. मात्र एवढा लांब प्रवास करणारे प्रवासी नसल्याने गोंदियाची रातराणी यवतमाळपर्यंतच चालविली जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रातराणीची सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी प्रतिसाद नसल्याने महिनाभरापूर्वी पुन्हा बंद करण्यात आली.
----------------------------------
आगाराकडे फक्त एकच रातराणी
जिल्ह्यासाठी गौरवाची बाब म्हणजे, अवघ्या विभागात फक्त गोंदिया आगारालाच एक रातराणी देण्यात आली आहे. ही रातराणी गोंदिया-नांदेड धावते. मात्र प्रवासी प्रतिसाद नसल्याने ती सुद्धा बंद करण्यात आली आहे.
----------------------------
परराज्यात वाहतूक बंदच
आगारातून मध्यप्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांत बसेस पाठविल्या जातात. मात्र मध्यप्रदेश राज्यात अद्याप प्रवेशबंदी आहे. तर छत्तीसगड राज्यात एक फेरी आहे. मात्र या दोन्ही राज्यांत रातराणी जात नाही.
---------------------------
रजेगावपर्यंतच सोडते बस
मध्यप्रदेश राज्याने कोरोनामुळे महाराष्ट्रातील बसेसला प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे आगाराच्या बसेस प्रवाशांना दोन्ही राज्यांची सीमा असलेल्या रजेगाव या गावातच सोडते. त्यानंतर त्या बाजूला जाऊन मध्यप्रदेशातील वाहनाने प्रवास करावा लागतो. यामुळे आमची अडचण होते. प्रवास सुरू झाल्यास थेट बालाघाटपर्यंत बस जाते.
- राकेश बिसेन
------------------------------
गोंदिया-बालाघाटचे संबंध असल्याने कामानिमित्त व खरेदीसाठी दोन्ही बाजूच्या नागरिकांचे ये-जा असते. आता मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील बसेसला बंदी असल्यामुळे बसेस प्रवाशांना रजेगाव येथेच सोडते. यामुळे पुढे जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते.
- नरहरी कोटांगले
-----------------------------------
विभागात फक्त गोंदिया आगाराच रातराणी देण्यात आली आहे. आपल्याकडे फक्त एकच रातराणी असून ती नांदेडपर्यंत धावते. मात्र प्रवासी प्रतिसाद नसल्याने ती यवतमाळपर्यंत सोडली जात होती. आता मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे.
- उमेश उके
वाहतूक नियंत्रक, गोंदिया.
---------------------------