जिल्ह्याने पार केला २.५० लाख लसीकरणाचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:22+5:302021-06-02T04:22:22+5:30
गोंदिया : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमाने राबविली जात असून याचे फलित असे की, जिल्ह्याने लसीकरणाचा अडीच ...
गोंदिया : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमाने राबविली जात असून याचे फलित असे की, जिल्ह्याने लसीकरणाचा अडीच लाखांचा टप्पा पार केला असून सोमवारपर्यंत (दि.३१) जिल्ह्यात २५१३४१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये युवा व वृद्धांचा समावेश असलेल्या ४५-६० वयोगटातील नागरिकच टॉपवर असून त्यांची संख्या १०७४५९ एवढी आहे.
मागील वर्षी देशात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हा त्याने चांगलाच कहर केला होता. तेव्हा कोरोनावर मात करण्यासाठी कोणतेही औषध हाती आले नव्हते. मात्र, सन २०२१ मध्ये दोन लसी तयार करण्यात आल्या व त्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारीपासून अवघ्या देशातच सुरुवात झाली आहे. त्यात एप्रिल महिना जिल्ह्यासाठी काळ ठरला असून दुसऱ्या लाटेने शेकडोंच्या संख्येत नागरिकांचा जीव घेतला. अशात तज्ज्ञांनी कोरोनाला पुढे मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच उपाय असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, अवघ्या देशातच लसीकरणासाठी चळवळच उभारण्यात आली असून जिल्ह्यातही जास्तीत जास्त लसीकरणासाठी धडपड सुरू आहे. यासाठी शहरी भागापासून ते ग्रामीण भागातही नागरिकांच्या सोयीसाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. जेणेकरून लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे व अशात त्यांना कसलाही त्रास होऊ नये याची दखल घेतली जात आहे. विशेष म्हणजे, त्याचे फलितही आता दिसू लागले असून सोमवारपर्यंत (दि.३१) जिल्ह्यात २५१३४१ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, लसीकरणाच्या या मोहिमेत ४५-६० वर्षे वयोगटातील युवा व वृद्धांचेच जास्त प्रमाण दिसून येत असून सुरूवातीपासूनच ते टॉपवर आहेत. यामध्ये ८६२७५ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून २११८४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यानंतर ६० वर्षे वयोगटातील नागरिकांचा गट असून यातील ८२५०४ नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे.
----------------------------------
लसीला घेऊन नागरिकांत भ्रम
कोरोनाला मात देण्यात लस यशस्वी ठरली असून लस सर्वांसाठीच सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, लसीला घेऊन आजही कित्येकांत भ्रम व भीती दिसून येत आहे. हा प्रकार ग्रामीण भागात दिसून येत असतानाच शहरातील नागरिकांचाही यात समावेश आहे. हेच कारण आहे की, गावागावांत व शहरातील प्रत्येकच भागात लसीकरणासाठी केंद्र असूनही नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. यामुळेच लसीकरणाची टक्केवारी आहे त्या प्रमाणात कमीच आहे. नागरिकांनी भ्रम काढून लस घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
-----------------------------
१८-४४ वयोगटाचे लसीकरण करा
शासनाने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला आहे. मात्र, असे असतानाच १८-४४ हा महत्त्वपूर्ण वयोगट लसीकरणापासून दूर ठेवला आहे. तरुण व युवा वर्गाचा समावेश असलेला हा गट घरकाम तसेच नोकरी व व्यवसायानिमित्त घराबाहेर असतो व नागरिकांच्या संपर्कात राहतो. अशात त्यांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने त्यांचे लसीकरण करण्याची गरज आहे. विशेष म्हणजेच,पालकांनाही याची चिंता सतावत आहे. म्हणूच आता सर्वांचे लसीकरण करावयाचे असतानाच १८-४४ गटाचे लसीकरण पुन्हा सुरू करा अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.