जिल्ह्यात 1477 लिटर लस साठवणुकीची क्षमता तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:00 AM2020-12-24T05:00:00+5:302020-12-24T05:00:36+5:30
केंद्र शासनानेही लसीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वच राज्यांना तयारीला लागण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र लसीकरणासाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. माहिती नुसार, जिल्ह्यात १४७७ लीटर लस साठवणुकीची क्षमता असून प्रत्येक तालुक्यापर्यंत लस वितरण व साठणुकीसाठीचे नियोजन करून ठेवले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वर्षभरापासून अवघ्या जगात हाहाकार माजवून ठेवलेल्या कोरोनावर आता नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधकांच्या अथक प्रयत्नांमुळे लस स्वरूपात एक आशेची किरण दिसून येत आहे. त्यामुळे आता अवघ्या जगाच्या नजरा या लसीकडे लागल्या असून कधी लसीकरणाला सुरूवात याची वाट सर्वच बघत आहेत. केंद्र शासनानेही लसीकरणाच्या दृष्टीने आपल्या सर्वच राज्यांना तयारीला लागण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र लसीकरणासाठी टप्पे ठरवून देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. माहिती नुसार, जिल्ह्यात १४७७ लीटर लस साठवणुकीची क्षमता असून प्रत्येक तालुक्यापर्यंत लस वितरण व साठणुकीसाठीचे नियोजन करून ठेवले आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून, ग्रामीण रूग्णालयांनाही सामावून घेत त्यांचीही सोय करण्यात आली असून आता फक्त लस येण्याची वाट आहे.
डिप फ्रिजरची व्यवस्था
कोरोनावर मात करणारी लस आता लवकरच येणार असल्याने केंद्र शासनाकडून लसीकरणासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हयातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. लसीच्या साठवणुकीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून, ग्रामीण रूग्णांलयांपर्यत डीप फ्रिजरची सोय करण्यात आली आहे.
व्हॅक्सीन व्हॅनद्वारे होणार लसीचे वितरण
लस आल्यानंतर तिचे वितरण जिल्ह्यातील आठही तालुक्यांत करावे लागणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेकडून व्हॅक्सीन व्हॅनद्वारे वितरण केले जाणार आहे. लसी साठवणुकीच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्ण, जिल्हा व उपजिल्हा रूग्णालय तयार करण्यात आले असून यंत्रणा सज्ज आहे.
लसीकरणाला घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचे राज्यस्तर व जिल्हास्तरावर प्रशिक्षण झाले आहे. आता तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. लसीकरणाला घेऊन जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
- डॉ.नितीन कापसे
जिल्हा आरोग्य अधिकारी