जिल्ह्याचा आरोग्य विभाग राज्यात आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:05 PM2019-04-16T22:05:38+5:302019-04-16T22:06:02+5:30
आरोग्य सेवा व आरोग्यासंदर्भात असलेल्या योजनांचा फायदा गोंदिया जिल्हावासीयांना देण्यात जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. विविध कामात उत्तम कामगीरी बजावल्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग आघाडीवर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरोग्य सेवा व आरोग्यासंदर्भात असलेल्या योजनांचा फायदा गोंदिया जिल्हावासीयांना देण्यात जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. विविध कामात उत्तम कामगीरी बजावल्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग आघाडीवर आहे.
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पहिल्या टप्प्यात गर्भवती महिलांना ५ हजार रूपये मदत राशी देण्याचे योजनेत नमूद आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रसूतीच्या वेळी महिलांना ५ हजार रूपये देण्यासाठी शासनाने १२ हजार १३५ महिलांचे उद्दीष्टे दिले होते. परंतु गोंदिया जिल्ह्याने उद्दिष्ठापैकी दीड पट काम म्हणजे १४९.९१ टक्के महिलांना मदत दिली आहे.
एप्रिल ते मार्च या कालावधीत १२ हजार १३५ महिलांना लाभ द्यायचा होता.परंतु गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने १८ हजार १९२ महिलांना लाभ दिला आहे. हा लाभ देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शिवाय मातामृत्यू व बालमृृत्यूवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
सन २०१७-१८ या वर्षात १२ माता मृत्यू होते, तो आकडा कमी झाला असून सन २०१८-१९ या वर्षात ५ माता मृत्यू झाले आहेत. सन २०१७-१८ या वर्षात ३९५ बालमृत्यू होते. तो आकडा कमी झाला असून सन २०१८-१९ या वर्षा ३०३ बालमृत्यू झाले आहेत. राज्याच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरापेक्षा कमी दर गोंदियाच्या आरोग्य विभागाने केला आहे.
बालमृत्यू व मातामृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच गर्भवती महिलांना सकस आहार देण्यात यावे. जेणेकरून पोटातच बालके कुपोषित होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. क्षयरोगावरही नियंत्रण आणण्यात आरोग्य विभाग बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे.
गर्भवतींना प्रसूतीच्या काळात जोखीम पत्करावी लागू नये यासाठी प्रत्येक प्रसूती ही आरोग्य संस्थेतच व्हावी हा आमचा आग्रह आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आपल्या मदतीला असून प्रत्येक गर्भवतींना प्रसूतीसाठी आरोग्य संस्थेतच त्यांना दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा.
- डॉ.श्याम निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.