जिल्ह्यात वाढले दीड लाख मतदार
By admin | Published: August 28, 2014 11:52 PM2014-08-28T23:52:38+5:302014-08-28T23:52:38+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने आपली तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
विधानसभा निवडणूक : प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
गोंदिया : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने आपली तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अमित सैनी यांनी गुरूवारी आदर्श आचारसंहितेची आणि पेड न्यूज संदर्भातील माहिती देणारी संयुक्त कार्यशाळा घेऊन शासकीय नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जिल्हाभरात दिड लाख मतदार वाढले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या कार्यशाळेला जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के. लोणकर, गोंदिया मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तिरोडा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, अर्जुनी मोरगाव मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिलीप मनकवडे, आमगाव क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा देवरीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांच्यासह सर्व तहसीलदार, सर्व विभागांचे जिल्हा प्रमुख, सर्व मतदार संघातील सहायक निवडणूक निरीक्षक (खर्च), तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये २००९ च्या निवडणुकीच्या वेळी एकूण ८ लाख ७० हजार २७२ मतदार होते. यावेळी त्यात १ लाख ४८ हजार २९६ मतदारांची भर पडल्याने मतदारांची एकूण संख्या १० लाख १८ हजार ५६८ झाली आहे.
चारही विधानसभा मतदार संघांबाबतची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर यांनी यावेळी दिली. अर्जुनी मोरगाव मतदार संघात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्याचा काही भाग येतो. तिरोडा मतदार संघात तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया मतदार संघाचा काही भाग समाविष्ठ होतो. आमगाव मतदार संघात आमगाव, देवरी आणि सालेकसा हे तीन तालुके तर गोंदिया मतदार संघात केवळ गोंदिया तालुक्याचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)