अटकेच्या मागणीचे जिल्हाभर पडसाद

By admin | Published: April 11, 2016 01:54 AM2016-04-11T01:54:23+5:302016-04-11T01:54:23+5:30

गोंदियाचे ज्येष्ठ काँग्रेस आमदार आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यावर भाजप नगरसेवकाकडून ...

District level of demand for arrest | अटकेच्या मागणीचे जिल्हाभर पडसाद

अटकेच्या मागणीचे जिल्हाभर पडसाद

Next

ठिकठिकाणी निषेधात्मक बंद : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाला निवेदने सादर
गोंदिया : गोंदियाचे ज्येष्ठ काँग्रेस आमदार आणि राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्यावर भाजप नगरसेवकाकडून शनिवारी सायंकाळी झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद रविवारी संपूर्ण जिल्ह्यात उमटले. ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आवाहनानुसार बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. हल्लेखोरांना अटक करा, गुंडगिरी बंद करा, अशा मागण्यांची निवेदने देण्यात आली.
गोंदिया शहरात शनिवारी रात्रीच बाजारपेठ बंद झाली होती. रविवारी काही व्यापाऱ्यांनी किरकोळ प्रमाणात दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी मोटरसायकलने फिरून त्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांची भेट घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, हल्लेखोर नगरसेवक शिव शर्मा आणि साथीदार राहुल श्रीवास यांच्यावर रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत गोंदियात बंद पाळला जाईल, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
देवरीत मूक मोर्चा
देवरी : आ.गोपालदास अग्रवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी देवरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढून देवरीचे प्रभारी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
कोरोटे यांच्या निवासस्थानातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयात दाखल झाला. तहसील कार्यालयापासून हा मोर्चा बाजार लाईन, पंचशिल चौकावरुन पुन्हा कोरोटे यांच्या निवासस्थानी समारोप झाला. याप्रसंगी मोर्चात माजी आ.रामरतन राऊत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया, जि.प. सदस्य उषा शहारे, माधुरी कुंभरे, देवरी पं.स. उपसभापती संगीता भेलावे, माजी जि.प. सदस्य संदीप भाटीया, अ‍ॅड. प्रशांत संगिडवार, दिलीप संगीडवार, जैपाल शहारे, ओमराज बहेकार, गणेश भेलावे, शकील कुरेशी, अविनाश टेंभरे, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, सुरेंद्र बन्सोड, बळीराम काटेवार, संदीप मोहबीया, कुलदीप गुप्ता, छगनलाल मुंगमकर, राजेश खंडाते, सुरेश शाहू, नरेश शहारे, सावंत राऊत आणि देवरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
गोरेगावात कडकडीत बंद
गोरेगाव : भ्याड हल्लाप्रकरणी रविवारी नगरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करुन कडकडीत बंद पाळण्यात आला. स्थानिक आॅटो चालक व काळी-पिवळी चालकांनी सुद्धा बंद पाळला हे विशेष. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी जि.प. सदस्य जगदीश येरोला यांनी सकाळीच पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांना शांतता भंग होऊ नये म्हणून निवेदन दिले. बसस्थानकापासून दुकाने बंद करण्यासाठी येरोला, डॉ.एन.डी. किरसान, डॉ.झामसिंग बघेले, तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे, राजेंद्र राठोड, जि.प. सभापती पी.जी. कटरे, जितेंद्र कटरे, आशिष बारेवार, राहुल कटरे, अरविंद फाये, अरविंद जायस्वाल, ज्योती वालदे, मलेशाम येरोला, रवींद्र चन्ने, सुरेश चन्ने, महाप्रकाश बिजेवार, सरपंच कुऱ्हाडी संजय आमदे, धनलाल पिसे, खिरचंद येळे तसेच सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी मुरदोली व मुंडीपार गावातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून गोरेगावात सहभाग दर्शविला. नगरातील सर्व दुकाने बंद करुन पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांना निवेदन देवून महारॅलीची सांगता करण्यात आली.
सालेकसा तालुक्यात कडकडीत बंद
सालेकसा/साखरीटोला : आ.अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सालेकसा, साखरीटोला तसेच बिजेपार येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध केला. हल्ल्याचा निषेध करुन मारेकऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीकरिता कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सकाळी १० वाजेपासून साखरीटोला येथे चौकात एकत्र येवून येथील दुकाने बंद पाडण्यात आली. दुकानदारांनी बंदला प्रतिसाद दिला.
बंदमध्ये सहभाग घेऊन निषेध नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पं.स.चे सभापती हिरालाल फाफनवाडे, पं.स. सदस्य दिलीप वाघमारे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, संजय दोनोडे, डॉ. संजय देशमुख, भूमेश्वर मेंढे, संतोष बोहरे, सुकलाल राऊत, राहुल मिश्रा, संजय कुसराम, अशोक मेहर, देवराम खोटेले, शामलाल दोनोडे, दौलत गिरी, भिवराम कोरे, महेश् काळे, बिजेपारचे माजी सरपंच रमेश शहारे, दिलीप राणे, मेहतर वट्टी, नरेंद्र दोनोडे, विनोद बारसे आदींनी पुढाकार घेतला. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)

हा जीवे मारण्याचाच प्रयत्न
या घटनेसंदर्भात आ.गोपालदास अग्रवाल यांचे चिरंजीव विशाल अग्रवाल यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, शिव शर्मा व राहुल श्रीवास यांनी आपल्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन कठीण शस्त्राने हल्ला केला. शर्मा याने आपल्या वडिलांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना वाचविण्यासाठी गेलो असता माझ्यावरही धारदार शस्त्राने हल्ला केला, असे विशाल अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३०७, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम ठेवा
भाजपाच्या वतीने रविवारी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आले. त्यात नमुद केल्यानुसार, आ.गोपालदास अग्रवाल यांना झालेली मारहाण ही निषेधार्ह असून त्यासाठी नगरसेवक शिव शर्माला भाजपातून निलंबित केले आहे. मात्र आता अग्रवाल यांच्या समर्थकांकडून शहरात दहशत पसरवून दुकानांची तोडफोड करण्याचा प्रकार योग्य नाही. नागरिकांना असुरक्षित वातावरणातून बाहेर काढून शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखावी, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली आहे.

Web Title: District level of demand for arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.