लसीकरणात जिल्ह्याची शतकपूर्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:18+5:302021-09-25T04:31:18+5:30
गोंदिया : लवकरात लवकर लसीकरण आटोपण्यासाठी शासनासोबतच प्रत्येकच जिल्ह्याची धडपड सुरू आहे. त्यानुसार, गोंदियातही लसीकरणाची मोहीम जोमात राबविली जात ...
गोंदिया : लवकरात लवकर लसीकरण आटोपण्यासाठी शासनासोबतच प्रत्येकच जिल्ह्याची धडपड सुरू आहे. त्यानुसार, गोंदियातही लसीकरणाची मोहीम जोमात राबविली जात आहे. हेच कारण आहे की, गुरुवारपर्यंत (दि.२३) जिल्ह्यात १००८९०८ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची ९८ एवढी टक्केवारी आहे. यात ७२२५७४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २८६३३४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८ एवढी टक्केवारी आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजविलेला कहर बघता शासनापासून जनतेपर्यंत सर्वांमध्येच धडकी भरली आहे. कित्येकांचा जीव घेणारी दुसरी लाट आजही अंगावर थरकाप आणणारी असून ही परिस्थिती यापुढे देशात निर्माण होऊ नये यासाठी शासनाने लसीकरणावर जोर दिला आहे. जास्तीत जास्त लसीकरण करून कोरोना थोपविण्यासाठी शासनासह जिल्हा प्रशासनाची धडपड सुरू आहे. यातूनच जिल्ह्यात २०० च्या घरात केंद्र सुरू करून नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. याचेच फलित असे की, गुरुवारपर्यंत जिल्हयात १००८९०८ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची ९८ एवढी टक्केवारी आहे. यात ७२२५७४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २८६३३४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८ एवढी टक्केवारी आहे.
विशेष म्हणजे, लसीकरण सुरू झाले तेव्हापासूनच जिल्हा अग्रेसर राहिला आहे. त्यात आता जिल्ह्याचे ९८ टक्के लसीकरण आटोपले असल्याने जिल्ह्याची शतकपूर्तीकडे वाटचाल दिसून येते. येत्या काही दिवसांतच जिल्हा हे उद्दिष्ट गाठणार यात शंका नसून असे झाल्यास गोंदिया जिल्हा राज्यात शंभर टक्के लसीकरण करणारा पहिला जिल्हा ठरणार असे दिसते. मात्र यासाठी आता जिल्हावासीयांनी लवकरात लवकर लस घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.
-----------------------------------
दुसरा डोस टोलवू नका
लसीकरणात जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करून अग्रेसर आहे यात जिल्हा प्रशासनासह जिल्हावासीयांचे कौतुक करणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाच एकीकडे जेथे पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ७० एवढी आहे. तेथेच फक्त २८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, काही व्यक्ती बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. कोरोनापासून बचावासाठी दोन्ही डोस गरजेचे असल्याचे सांगितले जात असून डोस टोलविणाऱ्यांना माहिती नसावे अशी बाब नाही. मात्र काही ना काही कारण पुढे करून ते स्वत:सह कुटुंबीयांनाही धोक्यात टाकत आहे समजून घेण्याची गरज आहे.
-----------------------------
आपल्या कुटुंबासाठी तरी लस घ्या
कित्येक नागरिकांना आजही कोरोना व त्यावर प्रतिबंधासाठी आलेल्या लसींवर विश्वास नाही. यातूनच ते फुशारकी मारत जाणून लस घेण्याचे टाळत आहेत. काहीही असो मात्र लस घेणार नाही या आवात त्यांची वागणूक सुरू आहे. मात्र लस घेतल्यानंतर स्वत: सुरक्षित होत असतानाच आपल्यापासून संपर्कातील व्यक्तीला संसर्ग होत नसल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र लस न घेतल्यास कुटुंबीयही धोक्यात येणारच. करिता आपल्या कुटुंबीयांसाठी तरी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.