लसीकरणात जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:12+5:302021-06-19T04:20:12+5:30

गोंदिया : कोरोनाला आता यापुढे पाय पसरू द्यायचे नाहीत, हा निर्धार करून राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम राबविली जात असून, ...

The district ranks ninth in the state in vaccination | लसीकरणात जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर

लसीकरणात जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर

Next

गोंदिया : कोरोनाला आता यापुढे पाय पसरू द्यायचे नाहीत, हा निर्धार करून राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम राबविली जात असून, ती आता एक चळवळ बनली आहे. विशेष म्हणजे, ही चळवळ आता जिल्ह्यात पेटून उठली असून, याचे फलित असे की, लसीकरणात गोंदिया जिल्हा मागील सात दिवसांच्या कालावधीत राज्यात नवव्या क्रमांकावर आला आहे. याबाबत राज्य शासनाने ८ ते १४ तारखेपर्यंतचा अहवाल पाठविला आहे.

मागील सुमारे दीड वर्षापासून अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनाने कहर केला आहे. यामध्ये कित्येकांना पूर्ण जन्मात न मोजता येणारे नुकसानही सहन करावे लागले आहे. पहिल्या लाटेत कोरोनाने कहर केलाच. मात्र, आता कोरोनाशी लढण्यासाठी लस हाती असूनही दुसऱ्या लाटेने कित्येकांचा जीव घेतला असून, ही बाब सर्वाधिक दु:खद आहे. त्यातही शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त लसीकरण हाच उपाय असल्याचे स्पष्ट केल्याने लसीकरणाचा अभाव दुसऱ्या लाटेसाठी फायद्याचा ठरल्याचे दिसले. अशात आता कोरोनाला यापुढे आपले पाय पसरू द्यायचे नाहीत, हा निर्धार करून शासनाने लसीकरण मोहिमेला अधिकाधिक वेग दिला आहे. लसीकरणाच्या या मोहिमेत महाराष्ट्र अग्रेसर असून, राज्यात लसीकरणाची एक मोहीम सुरू आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाच्या या कामावर राज्य शासनाची बारीक नजर आहे. यातूनच राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने राज्यात ८ ते १४ तारखेपर्यंत या ७ दिवसांच्या कालावधीत केलेल्या लसीकरणाचा अहवाल पाठविला आहे. या अहवालानुसार गोंदिया जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर असून, जिल्ह्याने या कालावधीत ३९,३९० एवढे लसीकरण केले असून, दर दिवशी ५,६२७ एवढी त्याची सरासरी असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------

जिल्हा विभागात प्रथम

राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने पाठविलेल्या या अहवालानुसार गोंदिया जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर असून, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. मात्र, यापेक्षा मोठी खुशखबर अशी की, विभागात गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकावर दिसून येत आहे. म्हणजेच, लसीकरणाच्या या मोहिमेत जिल्ह्याची कामगिरी उत्कृष्ट असून, अशीच कामगिरी सुरू राहिल्यास जिल्हा लवकरच १०० टक्के लसीकरण झालेला जिल्हा म्हणून पुढे येणार, यात शंका नाही.

------------------------------

लसीकरणाचे काम वाढवा

कुटुंब कल्याण कार्यालयाच्या १५ जून रोजीच्या पत्रानुसार राज्याला लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असूनही ७ दिवसांत राज्यात १२,०५,२८९ एवढे लसीकरण झाले आहे. म्हणजेच १,७२,१८४ एवढी त्याची प्रतिदिन सरासरी होत आहे. अशात लसीकरणाचे काम वाढविण्याच्या सूचना राज्याने दिल्या आहेत. यासाठी आता जिल्ह्यांना लसीकरणाची गती आणखी वाढविण्याची गरज दिसून येत आहे.

Web Title: The district ranks ninth in the state in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.