जिल्ह्याला मिळाले आणखी १७२०० डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:53+5:302021-04-04T04:29:53+5:30
गोंदिया : जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यात कोरोना ...
गोंदिया : जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू आहे. अशात लसींचा तुटवडा जाणवू नये म्हणून शासनाकडून लसींचा पुरवठा केला जात असून शनिवारी (दि.३) जिल्ह्याला आणखी १७२०० डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस कोव्हीशिल्ड लसीचे असून यामुळे लसीकरणाला आणखी गती येणार, यात शंका नाही.
कोरोनाचा वाढता उद्रेक बघता यावर तोडगा म्हणून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामुळे केंद्र शासनाने लसीकरणावर भर दिला असून त्यादृष्टीने काम सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातही लसीकरण लवकराच लवकर आटोपता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व सुरू असताना लसींचा तुटवडा होऊन लसीकरण थांबू नये याची दक्षता घेत शासनाकडून जिल्ह्याला शनिवारी (दि. ३) आणखी १७२०० डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस कोव्हीशिल्ड लसीचे आहेत. आतापर्यंत जिल्ह्याला १८२३४० डोस मिळाले असून यामध्ये १३२३४० डोस कोव्हीशिल्ड लसीचे आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी (दि.१) जिल्ह्याला ९२९२० डोसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात आता शनिवारी आणखी १७२०० डोस मिळाल्याने लसींचा तुटवडा निर्माण होणार नाही, हे विशेष.
...................
कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती निश्चितच वाढेल. तो आणखी सुरक्षित होईल. त्यामुळे ४५ वर्षांवरील प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी
.................
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे. उलट कोविड लसीमुळे सुरक्षितता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा अस्त्र म्हणून वापर होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील सुशिक्षित युवकांनी जनजागृती करण्याची गरज आहे.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.