जिल्ह्याला मिळाले लसीचे आणखी ४३ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:26 AM2021-03-14T04:26:35+5:302021-03-14T04:26:35+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू असल्याने झपाट्याने लसींचे डोस उपयोगात येत आहेत. अशात शुक्रवारी (दि. १२) जिल्ह्याला ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना लसीकरण जोमात सुरू असल्याने झपाट्याने लसींचे डोस उपयोगात येत आहेत. अशात शुक्रवारी (दि. १२) जिल्ह्याला आणखी ४३ हजार डोस मिळाल्याने लसीकरणात निर्माण होणारी लसींच्या तुटवड्याची अडचण अगोदरच सुटली. जिल्ह्याला मिळालेल्या या ४३ हजार डोसमध्ये १८ हजार डोस कोव्हिशिल्डचे तर २५ हजार डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. जिल्ह्याकडे आता पुरेपूर साठा असल्याने लसीकरणाला आता आणखी गती देता येणार आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी भारतात तयार झालेल्या कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मंजुरी दिली व १६ जानेवारीपासून अवघ्या देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाइन कोरोना वॉरिअर्सला लस देण्याचे ठरविले होते. मात्र, आता ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातही जोमात लसीकरण सुरू असून, झपाट्याने लसींची गरज पडत आहे. अशात गुरुवारी (दि. ११) जिल्ह्याकडे मात्र तीन हजार डोसचाच साठा उपलब्ध होता व तो किमान २ दिवसच पुरला असता. अशात लसींचा पुरवठा झाला नसता तर जिल्ह्यात लसीकरणात अडचण निर्माण झाली असती.
मात्र, शासनाकडून शुक्रवारी (दि. १२) जिल्ह्याला ४३ हजार डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये १८ हजार कोव्हिशिल्ड तर २५ हजार कोव्हॅक्सिनचे डोस आहेत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील लसीकरणाची अडचण सुटली असून, उलट लसीकरणाला आणखी गती देता येणार आहे.
-----------------------
जिल्ह्याला आतापर्यंत मिळाले ७९ हजार ९०० डोस
देशासह जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्याला आतापर्यंत ७९ हजार ९०० डोस मिळाले आहेत. यामध्ये सर्वप्रथम १४ जानेवारी रोजी १० हजार डोस, १ फेब्रुवारी रोजी ८ हजार डोस, १५ फेब्रुवारी रोजी ८ हजार ३०० डोस, २ मार्च रोजी १० हजार ६०० डोस तर १२ मार्च रोजी ४३ हजार डोस मिळाले आहेत. म्हणजेच, आतापर्यंत जिल्ह्याला एकूण ७९ हजार ९०० डोस मिळाले आहेत.
----------------------
लसीकरणानंतरही खबरदारी गरजेची
कोरोनावर असलेली ही लस अत्यंत प्रभावी आहे. मात्र, लस घेतल्यानंतर आपल्याला कोरोना होणार नाही, हा आव आणून कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे चालणार नाही. लस घेतली तरीही तोंडावर मास्क, शारीरिक अंतराचे पालन व वारंवार हात सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुणे ही खबरदारी ठेवायचीच आहे.
-------------------
न घाबरता करा लसीकरण
कोरोनाची लस सर्वांसाठी अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मनात कुठलीही शंका न बाळगता लस घ्यावी. कोरोनाला मात देण्यासाठी नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे, तर सोबतच तोंडावर मास्क, शारीरिक अंतराचे पालन व स्वच्छता ठेवणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.
- डॉ. नितीन कापसे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.
----------------------
असा आहे लस मिळाल्याचा तक्ता
दिनांक प्राप्त डोस
१४ जानेवारी १०,०००
१ फेब्रुवारी ८,०००
१५ फेब्रुवारी ८,३००
२ मार्च १०,६००
१२ मार्च ४३ हजार