जिल्ह्याला मिळाले आणखी ९५२० डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:50+5:302021-03-26T04:28:50+5:30
गोंदिया : जिल्ह्यात लसीकरण गती घेत असतानाच लसींचा तुटवडा जाणवू नये यासाठी मंगळवारी (दि. २३ मार्च) जिल्ह्याला आणखी ९,५२० ...
गोंदिया : जिल्ह्यात लसीकरण गती घेत असतानाच लसींचा तुटवडा जाणवू नये यासाठी मंगळवारी (दि. २३ मार्च) जिल्ह्याला आणखी ९,५२० डोसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यंदा मिळालेले हे डोस कोविशिल्डचे असून, यानंतर आता जिल्ह्याला एकूण ८९,४२० डोस प्राप्त झाले आहेत.
केंद्र शासनाने भारत निर्मित कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर अवघ्या देशातच १६ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काही थांबलेला नाही. उलट कोरोना आता कहर करीत असल्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील काही आजार असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनाही लसीकरणासाठी लस उपलब्ध करवून देण्यात आली आहे. परिणामी, आता लसीकरणाला वेग येत असून, लसींची गरज भासत आहे. यामुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लसींचा पुरवठा करण्यात आला असून, मंगळवारी (दि. २३ मार्च) जिल्ह्याला लसीचे आणखी ९,५२० डोस मिळाले आहेत. यंदा जिल्ह्याला मिळालेले हे संपूर्ण डोस कोविशिल्डचे आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बुधवारपर्यंतची (दि. २४ मार्च) लसीकरणाची स्थिती बघता लसीकरण करण्यात आलेल्या एकूण ६१,३०४ नागरिकांपैकी ४८,५३३ नागरिकांनी कोविशिल्डचीच लस घेतली आहे. यामुळे जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच नागरिक जास्त पसंती देत असल्याचे दिसत आहे.
-------------------------
६४४२० कोविशिल्ड लसींचा पुरवठा
जिल्ह्यात आतापर्यंत लसींचे ८९,४२० डोस मिळाले आहेत. यामध्ये १४ जानेवारी रोजी १०,००० डोस, १ फेब्रुवारी रोजी ८,००० डोस, १५ फेब्रुवारी रोजी ८,३०० डोस, २ मार्च रोजी १०,६०० डोस मिळाले आहेत. हे संपूर्ण डोस कोविशिल्डचे होते. १२ मार्च रोजी ४३,००० डोस मिळाले असून यामध्ये १८,००० डोस कोविशिल्डचे तर २५,००० डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. तसेच २३ मार्च रोजी ९,५२० डोस मिळाले असून, हे संपूर्ण डोस कोविशिल्डचेच आहेत. अशा प्रकारे जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेल्या एकूण ८९,४२० डोसेसमध्ये ६४,४२० डोस कोविशिल्डचे आहेत.
-----------------------------
लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटत असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात आता लस आली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी लसीकरण करवून घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे आकडेवारीवरून बोलता येते. लसीकरणाला आता अडीच महिने पूर्ण होत असून, झालेले लसीकरण तुलनेत कमीच आहे. अशात आता नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी केले आहे.