जिल्हावासीयांनो आता तरी व्हा सावध, मृतकांचा आलेख उंचावतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:29 AM2021-04-17T04:29:04+5:302021-04-17T04:29:04+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पाय पसरत असून शहरासह ग्रामीण भाग सुध्दा कोरोनाच्या विळख्यात आला आहे. मात्र यानंतरही नागरिकांनी ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना झपाट्याने पाय पसरत असून शहरासह ग्रामीण भाग सुध्दा कोरोनाच्या विळख्यात आला आहे. मात्र यानंतरही नागरिकांनी गांभीर्याने घेतलेले नाही. त्यातच कोरोना बाधित मृतकांचा आकडा दररोज वाढत आहे. शुक्रवारी (दि.१६) रेकाॅर्ड ब्रेक २९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर मागील सहा दिवसांच्या कालावधीत ९५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतातरी जिल्हावासीयांनी वेळीच सावध हाेत स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयातील बेड सुध्दा हाऊसफुल्ल झाले असून रुग्णांना दाखल करण्यासाठी अक्षरक्ष: रुग्णालयांना विनंती करावी लागत आहे. असे बिकट चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात २९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर ५७८ नवीन रुग्णांची भर पडली. तर ३९० बाधितांनी कोरोनावर मात केली. ५७८ रुग्णांमध्ये सर्वाधिक २४८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा १२०, गोरेगाव २८, आमगाव ९६, सालेकसा २८, देवरी २९, सडक अर्जुनी ५, अर्जुनी १७ आणि बाहेरील राज्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १२०६४५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०२३१४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १११६७० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९९३१९ नमुने निगेटिव्ह आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३९९६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १७४९८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ६१९७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १५३१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.................
बाप रे.. सहा दिवसात ९५ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख वाढत असताना बाधित मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. ११ ते १६ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तब्बल ९५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी २९ बाधितांचा मृत्यू झाला असून हा आतापर्यंत सर्वाधिक आकडा होय.
...........
ऑक्सिजन व रेमडेसिविरची समस्या कायम
कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्रीच गोंदिया येथे ऑक्सिजन साठा संपत आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. हे सर्व चित्र पाहता नागरिकांनी आता सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
............
आरटीपीसीआर किटचा तुडवटा
कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. शुक्रवारी गोंदिया शहरातील पाच आरटीपीसीआर चाचणी केंद्रावर किटचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांना चाचणी न करताच घरी परतावे लागले. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे.