जिल्हावासीयांनो वेळीच व्हा सावध, आलेख उंचावतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:28 AM2021-03-19T04:28:10+5:302021-03-19T04:28:10+5:30
गोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढत होत आहे. गोंदिया, तिरोडा, आमगाव या तीन तालुक्यांत रुग्णसंख्येत ...
गोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढत होत आहे. गोंदिया, तिरोडा, आमगाव या तीन तालुक्यांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यावासीयांनी वेळीच सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील रुग्णसंख्येत यामुळे वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने सुद्धा कठोर उपाययोजना राबविण्याची गरज आहे. नाही तर हे जिल्हावासीयांवर बेतू शकते. जिल्ह्यात गुरुवारी ५१ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर २५ बाधितांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी आढळलेल्या ५१ रुग्णांमध्ये सर्वाधिक २७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ९, गोरेगाव ६, आमगाव १, सडक अर्जुनी ४, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ३ आणि बाहेरील राज्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ८९६८७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ७६१७६ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत ७७४७५ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१२४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४८९५ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४३८० जणांनी मात केली आहे. सद्य:स्थितीत ३२८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १४२४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...............
रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५४ टक्के
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५४ टक्के असल्याने थोडा दिलासासुद्धा मिळाला आहे. राज्यापेक्षा जिल्ह्याचा कोरोना ॲक्टिव्ह दर अधिक आहे. मात्र, रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक आहे.
...........