पंतप्रधानांच्या आवाहनाला जिल्हावासीयांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:24+5:30
संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या अंधकाररुपी संकटावर १३० भारतीयांच्या एकजुट आणि प्रकाशपर्वातून मात करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केले होते. यासाठी रविवारी (दि.५) रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करुन दिवे, मेणबत्ती अथवा मोबाईल टॉर्च सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. याला जिल्हावासीयांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नऊ मिनिटांसाठी सर्वांच्या घरातील लाईट्स बंद असल्याने सर्व परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचे चित्र होते.
संपूर्ण देशच नव्हे तर जग कोरोना विरुध्द लढा देत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोना बाधीत रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून रविवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांचा ६९० च्यावर पोहचला. त्यामुळे संपूर्ण नागरिकांमध्ये दहशतीचे वातारण आहे. कोरोना विरुध्दची लढाई शासन आणि प्रशासन सध्या युध्द पातळीवर लढत आहे. हा लढा अधिक तीव्र करुन देशवासीयांची या लढ्याविरुध्द एकजूट दाखवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवे, मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला गोंदिया शहर आणि जिल्हावासीयांकडून प्रतिसाद मिळाला. या प्रकाशपर्वात जवळपास सर्वच नागरिक सहभागी झाल्याने कोरोनारुपी अंधकारमय वातावरणात प्रकाशरुपी भारतवायीयांच्या एकजुटीने एक प्रकारे विजय मिळविल्याचे चित्र पाहयला मिळाले.
या प्रकाशपर्वाची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी, युवक आणि नागरिकांकडून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून दोन तीन दिवसांपूर्वीपासूनच तयार केली जात होती. याचा सुध्दा काही प्रमाणात या प्रकाशपर्वात परिणाम दिसून आला.
कुणी अंगणात कुणी लावले गॅलरीत दिवे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील काही नागरिकांनी रात्री नऊ वाजता आपल्या घराच्या गॅलरीत आणि अंगणात दिवे लावले होते. त्यामुळे कोरोनाच्या अंधकारमय वातावरणावर या प्रकाशपर्वाने काहीशी मात केल्याचे चित्र होते.
मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्च
रविवारी (दि.५) रात्री नऊ वाजताच अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीत तर काही घराच्या प्रवेशव्दारासमोर येऊन व हातात मेणबत्त्या तसेच मोबाईल टॉर्च आॅन करुन या प्रकाशपर्वात आपला सहभाग नोंदवून भारतवासीयांच्या एकजुटीचा परिचय दिला.
हे प्रकाशपर्व
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर आहे. परिणामी सर्वत्र लॉकडाऊन असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि काहीसे नैराश्याचे वातावरण आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी रविवारी प्रकाशपर्व साजरे करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाल्याने हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर या प्रकाशपर्वामुळे थोडासा आनंद झळकल्याचे चित्र होते.