जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:12+5:302021-05-09T04:30:12+5:30
गोंदिया : मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील धान पिके संकटात आली आहेत. शनिवारी (दि. ...
गोंदिया : मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील धान पिके संकटात आली आहेत. शनिवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. जवळपास अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते, तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
हवामान विभागाने जिल्ह्यात ११ मेपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. तो अंदाज खरा ठरत आहे. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, तर या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील धान पिकाला आणि फळबागांना बसला आहे. सध्या रब्बी हंगामातील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतातील धान कापणी करून बांध्यामध्ये पडले आहे. या धानाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुद्धा अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला.