जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:23+5:302021-06-22T04:20:23+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यातच मागील आठवडाभरात जिल्ह्यात केवळ ४४ कोरोना बाधितांची नोंद ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यातच मागील आठवडाभरात जिल्ह्यात केवळ ४४ कोरोना बाधितांची नोंद झाली असून, त्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी ०.१९ टक्के आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील ५७ वर आली असून जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती पाहता गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्ग बराच आटोक्यात आला असून दुसरी लाट ओसरली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्यानेच जिल्ह्यात अनलॉक असून सर्वच व्यवहार आता सुरळीतपणे सुरु झाले आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यात केवळ ४४ बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी तिप्पट बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी (दि.२१) जिल्ह्यात १२ बाधितांनी कोरोनावर मात केली तर २ रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १८७३१६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १६२२७९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी २०२४४७ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १८१५१० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१०८६ काेरोना बाधित आढळले असून ४०३३० बाधितांनी मात केली आहे. सद्यस्थितीत ५७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
.............
२४१६ नमुन्यांची चाचणी
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी २४१६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ५९९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर १८१७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात दोन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८ टक्के आहे.
..................
लसीकरणात जिल्हा पुढे
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५० हजार ६५२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणात सुध्दा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.