गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थी मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:25 AM2018-09-11T11:25:12+5:302018-09-11T11:28:02+5:30
दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे, दैनदिन गरजा भागविताना ओढाताण होऊ नये यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये मानधन दिले जाते. तहसील कार्यालयातर्फे हे मानधन दर महिन्याला लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते. मात्र स्थानिक प्रशासनाकडून विविध कारणे सांगून मानधन जमा करण्यास विलंब केला जात आहे. कधी निधी नाही तर कधी कर्मचाऱ्यांची अडचण पुढे करुन मानधन जमा करण्यास विलंब केला जातो. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार लाभार्थी असून त्यांच्या बँक खात्यात जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्याचे मानधन जमा करण्यात आले नाही. परिणामी त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
तहसील कार्यालयातील कर्मचाºयांना याबाबत विचारणा केल्यास विविध कारणे सांगून परत पाठविले जाते. अनेकांचा दैनंदिन खर्च हा या मानधनावरच अवलंबून आहे. उधार घेऊन गरजा भागविण्याची वेळ आली आहे.
दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतंर्गत मिळणारे मानधन मिळालेले नाही. परिणामी दिव्यांगाना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने त्वरित दखल घेवून समस्या मार्गी लावावी.
-श्यामसुंदर बन्सोड,
दिव्यांग लाभार्थी गोरेगाव.