भरकटलेल्यांना यशाचा दीपस्तंभ बनली दिव्यांग उर्मिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:35 PM2018-12-02T21:35:24+5:302018-12-02T21:35:49+5:30

हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह ही केला नाही. पण नशिबात असेल तर मिळेल म्हणून हीे अपेक्षा न बाळगता प्रयत्न आणि मेहनत करणे सोडले नाही. याच मुलमंत्राची खूनगाठ बांधून दिव्यांग उर्मिलाने स्वंयरोजगार उभारला. आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर ती भरकटलेल्यांसाठी यशाचा दीपस्तंभ ठरत आहे.

Divyang Urmila became a lighthouse of success | भरकटलेल्यांना यशाचा दीपस्तंभ बनली दिव्यांग उर्मिला

भरकटलेल्यांना यशाचा दीपस्तंभ बनली दिव्यांग उर्मिला

Next
ठळक मुद्देदिव्यांगत्वावर मात करून ठेवला आदर्श : मेहतीने उभारला स्वंयरोजगार

हितेश रहांगडाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह ही केला नाही. पण नशिबात असेल तर मिळेल म्हणून हीे अपेक्षा न बाळगता प्रयत्न आणि मेहनत करणे सोडले नाही. याच मुलमंत्राची खूनगाठ बांधून दिव्यांग उर्मिलाने स्वंयरोजगार उभारला. आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर ती भरकटलेल्यांसाठी यशाचा दीपस्तंभ ठरत आहे.
दोन्ही हाताने अपंग असलेल्या उर्मिलाने स्वत:च्या कर्तृत्वात भर घालीत अपंगत्वास शक्तीस्थान बनवित आज स्वबळावर कुक्कुटपालन व आटाचक्की चालविण्याच्या व्यवसाय उभारला आहे. केवळ ५० पिल्लांपासून सुरु केलेल्या कुक्कुटपालनाचा व्यवसाय आज २००० पिल्लांसह जोमात सुरु आहे. उर्मिला परसराम पटले (४४) तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील रहिवासी. १९७४ ला जन्मलेली उर्मिला ही एक सामान्य मुलगी, इतरांसारखी खेळणारी बागडणारी प्राथमिक शिक्षण आनंदात पूर्ण झाले असतानाच तिच्या आयुष्याच्या हादरवून देणारी घटना घडली. वयाच्या १४ व्या वर्षी घरी थंडीचा दिवसात कुटूंबीयासह शेकोटी शेकताना तोल जाऊन ती शेकोटीत पडली व दोही हात, चेहरा जळल्याने कायमचे अपंगत्व आले. पण या अपंगत्वाची उणीव न बाळगता उर्मिलाने तिथूनच आयुष्याची सुरुवात केली. अपंगात्वामुळे सौभाग्यवती होण्याचे योग नसल्याने हेरून तिने वयाच्या २४ व्या वर्षी १९९८ ला कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला.७५ रुपयात ५० पिल्ले खरेदी करुन तिने व्यवसायाला सुरुवात केली.
त्यावेळी २५० रुपये नफा झाला त्यात उत्तरोत्तर वाढ करीत आधी ५०० पिल्लांसाठी शेड उभारले. त्यासाठी २००३ मध्ये महिला बचत गटात सहभागी घेऊन अंतर्गत कर्ज घेतले. यापुढे व्यवसायात वाढ झाली व त्यानंतर उर्मिलाने मागे वळून बघितलेच नाही. आयसीआयसीआय बँकेकडून १ लाखाचे कर्ज घेऊन २००० पिल्लांसाठी मोठे शेड उभारले, ते फेडून पुन्हा दीड लाखाचे कर्ज घेऊन विहीर बांधली.
यामुळे उर्मिलाला व्यवसाय करण्यात मदत होत आहे. कुक्कुटपालन व्यवसायाला जोड म्हणून उर्मिलाने शेडच्या बाजूला भाजीपाला पिकविण्यास सुरूवात केली.यामध्ये ती स्वत: काम करते. बी पेरणे, खत टाकणे, भाजी काढणे, विकणे, कुक्कुटपालनात पिल्लांचा चारा पाणी करणे, औषध देणे, पिल्लांची विक्री करणे अनेक कामे ती स्वत: करते.या व्यवसायासाठी तिला बाहेर ने आण करणे, बँकाचा पाठपुरावा करणे यासाठी तिचा भाऊ मोतीलाल पटले याची मोलाची साथ मिळत आहे. कुक्कुटपालन, भाजीपाला व्यवसाय यावरच मर्यादीत न राहता उर्मिलाने घरी आटाचक्की चालविण्याचे काम सुरु केले. यातून महिन्याकाठी हजार रुपयांच्या नफा कमवित आहे.
विशेष म्हणजे दिव्यांग उर्मिलाची जीद्द यावर थांबली नाही. ती आपल्या कार्य कर्तृत्वाने इतरांनाही प्रेरीत करण्याचे काम करीत आहे.जागृती महिला बचत गटाची ती स्वत: सदस्य असून १८ बचत गटाच्या सीआरपीचे काम ती स्वत: सांभाळत आहे.
यासाठी तिला तिच्या प्रभाग समन्वयीका माया कटरे, शिल्पा मेंढे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. जीवन हे एक रहस्य आहे. येथील अनेक दु:ख पचवायचे असतात. किती ही दु:ख असले तरी समस्यांपुढे हसायचे असते.अशीच भूमिका घेत उर्मिला आज तिच्या दिव्यांगत्वाला मात करुन समाजात सन्मानाने वावरत आहे.
जीवन किती कठीण आहे याचा कांगावा करीत बसण्यापेक्षा प्रत्येकाने काही तरी करायला सुरुवात करावी, तिथूनच पुढे यश मिळते.
-उर्मिला परसराम पटले, दिव्यांग उद्योजक.

Web Title: Divyang Urmila became a lighthouse of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.