कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:53+5:302021-04-17T04:28:53+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सभेला खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, अभिजीत वंजारी,विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपस्थित होते.
होती. पालकमंत्री म्हणाले ऑक्सिजन सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात करुन ठेवावा. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात येत असून लवकरच उपलब्ध होणार आहे. खासगी व शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची माहिती सांकेतिक स्थळावर (डॅशबोर्डवर) प्रसिध्द करण्यात येणार आहे. संचारबंदीचे काम पोलीस यंत्रणेने काटेकोरपणे करावे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात यावे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात कॉल सेंटर तयार करण्यात येणार आहे. डॉक्टर्स व नर्सेसची कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात पदभरती करण्यात यावी. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची पूर्तता करण्यात यावी. पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात यावा. आठवड्याभरात सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यात यावी. कोराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू व कोरोनावर मात करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
....
मेडिकलची केली पाहणी
पालकमंत्री नवाब मलिक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट देऊन तेथील रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सोई-सुविधांचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, गोंदिया
उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व सर्व जिल्हा
नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.