गटसचिवांना पीएम किसान सन्मान निधीची कामे देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:04+5:30
संस्थास्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पीक विमा ऑडीट, संस्थेच्या वार्षिक साधारण सभा घेणे यासारखी कामे खोळंबलेली आहेत. गटसचिव संघटनेने शुक्रवारी (दि. २३) जिल्हा उपनिबंधकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेची कामे करण्यास असमर्थ असल्याचे निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे जून महिन्यापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या कामात गुंतले असल्याने जिल्ह्यातील संस्थास्तरावरील कामे मागे पडले आहेत. त्यामुळे सचिवांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे कामे करु नये, त्यापासून त्यांना मुक्त करावे, असा पवित्रा जिल्ह्यातील संचालक मंडळाने घेतला आहे.
संस्थास्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पीक विमा ऑडीट, संस्थेच्या वार्षिक साधारण सभा घेणे यासारखी कामे खोळंबलेली आहेत. गटसचिव संघटनेने शुक्रवारी (दि. २३) जिल्हा उपनिबंधकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेची कामे करण्यास असमर्थ असल्याचे निवेदन दिले आहे. त्यानंतरही वरिष्ठ अधिकारी कामे पूर्ण करण्याबाबत सचिवांवर दबाव टाकत आहेत. सचिव हे संस्थेचे कर्मचारी असून त्याना संस्था पगार देते आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात गटसचिव पीएम किसान सन्मान योजनेची कामे करीत नाही. फक्त गोंदिया जिल्ह्यातच गटसचिवांना या कामात गुंतविले गेले आहे. त्यामुळे हा गटसचिवांवर अन्याय आहे. त्यामुळे सचिवांना सदर कामातून जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्त करावे, जेणेकरुन शेतकºयांना कर्जाचे वाटप त्वरीत करता येईल अशी मागणी संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली.
यात दर्शनसिंह वेदी, बालाभाऊ महारवाडे, नारायण फुंडे, घनश्याम पटले, विनोद चुटे, दुलीचंद शहारे, विद्यासागर पारधी, लेखराज दशरिया, प्रविणकुमार गहरवार यांनी केली आहे.