कुणीही योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये
By admin | Published: March 4, 2017 12:11 AM2017-03-04T00:11:25+5:302017-03-04T00:11:25+5:30
प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे.
नाना पटोले : जनता दरबारात ऐकल्या समस्या
सडक-अर्जुनी : प्रशासनाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे खेड्यापाड्यातील जनता बेजार झाली आहे. अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यांच्या समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी हा जनता दरबार आहे. त्यामुळे शासकीय योजनेच्या लाभापासून कुणीही वंचित राहू नये असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत शुक्रवारी (दि.३) आयोजीत जनता दरबारात ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर, पंचायत समिती सभापती कविता रंगारी, उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पातोडे, नगराध्यक्ष रिता लांजेवार, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, खंडविकास अधिकारी आनंद लोकरे, माजी पं.स.उपसभापती दामोदर नेवारे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, कृषी अधिकारी पेशेट्टीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बबन कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनता दरबारात वनहक्क जमिनीचे पट्टे या विषयात अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन अतिक्रमण दाखवून पट्टे मिळवून घेतल्याची चर्चा झाली. यावर चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीची गय केली जाणार नसल्याचे खासदार पटोले यांनी सांगीतले.
दरम्यान पाणी टंचाई, महावितरण संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या, महिला राजसत्ता आंदोलन, रोजगार हमी योजना, घरकूल योजना, स्वस्त धान्य वितरण व्यवस्था आदिंशी संबंधीत समस्या जाणून घेत संबंधीत अधिकाऱ्यांना खासदार पटोले यांनी सूचना केल्या. प्रथमच खासदारांचा जनता दरबार असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक आपल्या समस्यांची निवेदने घेऊन आली होती.
संचालन अनिल मेश्राम यांनी केले. आभार बिडीओ लोकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)