आपल्याला स्वराज्य मोफत मिळाल्यासारखे वागू नका
By admin | Published: August 24, 2014 12:05 AM2014-08-24T00:05:06+5:302014-08-24T00:05:06+5:30
गुलामगिरीत असलेल्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कित्येकांना प्राण गमवावे लागले. कित्येकांना शिक्षा भोगावी लागली. याचा लेखाजोखा शासनाकडे नाही. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य
बबनराव वानखेडे : क्रांतियोत यात्रेत मार्गदर्शन
आमगाव : गुलामगिरीत असलेल्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कित्येकांना प्राण गमवावे लागले. कित्येकांना शिक्षा भोगावी लागली. याचा लेखाजोखा शासनाकडे नाही. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक महापुरुषांना शासन तर विसरले आपणही विसरून स्वराज्य मोफत मिळाल्यासारखे वागत असल्याची खंत श्री गुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय प्रचारप्रमुख बबनराव वानखेडे यांनी व्यक्त केली.
श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीतर्फे आयोजित क्रांतिज्योत यात्रा प्रसंगी पद्मपूर येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्याला स्वराज्य मिळवून ६० वर्षाचा काळ लोटला परंतु ज्यांनी या स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले त्यांचे नाव राष्ट्र पुरुषांच्या यादीत नाही. ही खेदाची बाब आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशात क्रांतीकारी घडविणारे भजने गायली त्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना जेलमध्ये पाठविले. नागपूर व रायपूर या दोन जेलमध्ये राष्ट्रसंतांना चार महिने काढावे लागले. स्वराज्य मिळवून दिल्यानंतर सुराज्य कसे स्थापन होईल यासाठी आपला देह झिजविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव शासनाच्या यादीत स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपुरुषांमध्ये नाही. केंद्र व भारत सरकारने दखल घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत देण्याची मागणी करीत ही क्रांतीज्योत यात्रा जनजागृती करण्यासाठी काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री गुरुदेव सेवामंडळाचे केंद्रीय प्रचार सचिव दामोदर पाटील, विभागीय प्रचारक भानूदास कराडे, आजीवन प्रचारक टोंगे महाराज यवतमाळ, जिल्हा सेवाधिकारी एम.ए. ठाकूर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे शंकर वारंगे, अशोक चुटे, पुनाराम भांडारकर, ग्यानीराम ठाकरे, ललीत भांडारकर, नरेश रहिले, गंगा हुकरे, यशोदा रहिले, गीता शेंडे, जगदीश चुटे, भागरता भांडारकर, फागुलाल डुंबरकांबळे, शांता बागळे, कमला हुकरे व गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या क्रांतिज्योत यात्रेचे स्वागत पद्मपूर गुरुदेव सेवामंडळाच्या सदस्यांनी केले. यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी हुतात्मा ठरलेल्या शहिदांना व महापुरुषांना दोन मिनिटे मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ही यात्रा पुढच्या जनजागृतीसाठी रवाना झाली. (शहर प्रतिनिधी)