फोटोग्राफीतून सारसांना डिस्टर्ब करू नका
By admin | Published: January 10, 2016 01:57 AM2016-01-10T01:57:45+5:302016-01-10T01:57:45+5:30
राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात अधिवास असणाऱ्या सारसांचे महत्व देशाला आणि जगाला कळावे म्हणूनच सारस महोत्सवाच्या निमित्ताने फोटोशूट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मानद वन्यजीव रक्षक : बहेकार यांची कळकळ
गोंदिया : राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात अधिवास असणाऱ्या सारसांचे महत्व देशाला आणि जगाला कळावे म्हणूनच सारस महोत्सवाच्या निमित्ताने फोटोशूट स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात देशाच्या अनेक राज्यातील प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हजेरी लावत आहेत. पण यात काही हौशी छायाचित्रकार सारसांचा अधिवास असणाऱ्या ठिकाणी अगदी जवळ जाऊन फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. सारसांचे अस्तित्व जिल्ह्यात टिकविण्यासाठी वन्यजीव छायाचित्रणाचे ‘इथिक्स’ आधी समजून घ्या, मगच फोटोग्राफी करा, असा कळकळीचा सल्ला मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांनी दिला.
गेल्या १०-१२ वर्षांपासून वन्यजीवांच्या संवर्धनासाठी झटत असलेले बहेकार यांनी सारस महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ सोबत बोलताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. गेल्या १६ डिसेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या सारस महोत्सवाच्या आयोजनामागेही बहेकार यांची महत्वाची भूमिका आहे.
ते म्हणाले, हा महोत्सव म्हणजे केवळ पर्यटकांना आकर्षित करणे नाही तर आधी सारसांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांना त्याचे महत्व पटवून देणे हा पहिला उद्देश आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांच्यासारखे चांगले अधिकारी सध्या लाभले असल्याने या महोत्सवाची कल्पना प्रत्यक्षात उतरविणे शक्य होत आहे. आतापर्यंत सारसारख्या दुर्मिळ पक्ष्याचे महत्व कळले नसल्यामुळेच अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव तालुक्यातून हे सारस हद्दपार झाले आहेत. पण आता गोंदिया, तिरोडा, तालुक्यांसोबतच भंडारा आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यात काही प्रमाणात त्यांचे अस्तित्व दिसत असताना वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही तर त्यांनाही गमवावे लागेल. वन्यजीव फोटोग्राफी करताना केवळ महागडे कॅमेरे हाती असून चालणार नाही तर ज्या पक्षी किंवा वन्यप्राण्याचे छायाचित्र घ्यायचे आहे त्यांचा अभ्यास करणे आणि त्यांना डिस्टर्ब होणार नाही याची कळजी घेणे महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)