पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 09:23 PM2019-05-16T21:23:47+5:302019-05-16T21:24:08+5:30

गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे.एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३३ तलाव आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बहुतांशी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर काही तलावात नादुरुस्तीमुळे पाणीसाठा राहात नसल्याचे चित्र आहे.

Do not forget the administration of water, water supply and water supply | पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेचा प्रशासनाला विसर

पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेचा प्रशासनाला विसर

Next
ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव-दाभना मार्गावरील बोडीचे काम करण्याची गरज : अनेक वर्षांपासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे.एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३३ तलाव आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे बहुतांशी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तर काही तलावात नादुरुस्तीमुळे पाणीसाठा राहात नसल्याचे चित्र आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तलावांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पाणी अडवा,पाणी जिरवा असे शासनाचे धोरण आहे.मात्र ही उक्ती सध्यातरी केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. प्रशासनाच्याच मनात या दिशेने कार्य करण्याची इच्छा दिसून येत नाही.अर्जुनी मोरगाव ते दाभना या रस्त्यावर एक बोडी आहे.या बोडीत जंगलातील नाल्यांमधून पाणी येत असते.पावसाळ्यात तर अगदी तलावाचे स्वरुप येथे बघावयास मिळते. मात्र या बोडीचा सांडवा गेल्या काही वर्षापासून तुटून पडलेला आहे. यामध्ये जमा होणारे पाणी नाल्याद्वारे वाहून जाते. परिणामी या पाण्याचा उपयोगच होत नाही. सांडव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. याची प्रचिती त्यास्थळी गेल्यानंतर येते. सांडव्याच्या नजीक मोठ्या दगडांचे अस्तरीकरण (पिचिंग) करण्यात आले. अस्तरीकरणाच्या नावाखाली केवळ जमिनीत दगड मावेल एवढा खड्डा खोदून त्यात मोठे दगड पुरण्यात आले. यावरील माती वाहून गेल्याने त्याठिकाणी केवळ मोठ्या खड्यांचा खच दिसून येतो. सांडव्याच्या भिंतीला बुडाला सिमेंटचे काम न झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत हा सांडवा कोलमडून पडला आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शासनाच्या उदात्त धोरणाला खीळ पडत आहे.सध्या ही बोडीची जागा एक रुक्ष वाळवंटासारखी झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र इतरांना सांगण्यापेक्षा त्याचे स्वत:च पालन केल्यास मोठी समस्या मार्गी लागू शकते.
सिंचन व वन्यप्राण्यांना होऊ शकते मदत
सुमारे ४० एकर जागा असलेल्या या परिसरात गाळ उपसून सांडवा व तलावाची पाळ उंच केल्यास एक मोठे तलाव तयार होऊ शकते. या तलावाच्या पाण्याचा उपयोग वन्यप्राणी व सिंचनासाठी उपयुक्त ठरु शकते. मात्र या बोडीकडे कुणाचेच लक्ष नाही. बोडीचे काम केल्यास बारमाही पाणी याठिकाणी बघावयास मिळेल.
मजुरीच्या खर्चातही बचत करण्यास वाव
याच बोडीला लागून सागवन नर्सरी आहे आणि दुसºया बाजुला रोपवाटीका तयार करण्यात आली. या रोपवाटिकेत लागवड करण्यात आलेल्या झाडांसाठी सुमारे दोन कि.मी.अंतरावरुन पाणी आणले जाते. यासाठी मजुरांवर विनायास खर्च केला जात आहे. याठिकाणी पाणी आणण्यासाठी सुमारे ८ ते १० मजूर कामावर आहेत. जर या बोडीचा सांडवा व्यवस्थित असता तर अगदी ५० मिटर अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील झाडे जगविण्यासाठी २ कि.मी. अंतरावरुन पाणी आणण्याची वेळ आली नसती.

Web Title: Do not forget the administration of water, water supply and water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.