डोळ्याने पाहिलेली गोष्ट विद्यार्थी विसरत नाही!
By admin | Published: February 6, 2017 12:46 AM2017-02-06T00:46:21+5:302017-02-06T00:46:21+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे यासाठी शाळा डिजीटल करण्याचा उपक्रम सुरू आहे.
पुराम यांचे प्रतिपादन : पोवारीटोला डिजीटल शाळेचे उद्घाटन
आमगाव : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे यासाठी शाळा डिजीटल करण्याचा उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरावी हा त्या मागील उद्देश आहे. डोळ्याने पाहिलेली बाब डोक्यात शिरते. ती गोष्ट विसरत नाही. डिजीटल शाळेत प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिसलेली गोष्ट आम्ही विसरत नाही असे उद्गार आ. संजय पुराम यांनी काढले.
लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या पदमपूरच्या पोवारीटोला येथील डिजीटल शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा सचिव सुरेंद्र नायडू, दिप प्रज्वलक म्हणून एस.डी.बागडे, नरेश रहिले, उपसरपंच पुरुषोत्तम किरणारपुरे, माजी सरपंच डॉ. भरतलाल हुकरे, विस्तार अधिकारी सी.बी.पाचोळे, धर्मेद्र ठाकरे, ए.टी.रामटेके, लिलेश्वर कुरंजेकर, मुख्याध्यापक शरद उपलपवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमराव ठाकरे, जे.सी.देशकर, मुख्याध्यापक भगत, धुर्वे, उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. लोकवर्गणीतून डिजीटल करण्यात आलेल्या पोवारीटोला येथील शाळेचे लोकार्पणाप्रसंगी नागरिक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेनेचे जिल्हा सचिव सुरेंद नायडू यांनी देशात वाढणाऱ्या बेरोजगारीची वास्तविकता मांडली. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. आपल्या परिसरात सुशिक्षीत बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होत असून याकडे शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक भिमटे तर आभार उपसरपंच पुरूषोत्तम किरणापुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी खुशाल विठ्ठले, हिमालया राऊत, देशकर व गावकऱ्यांनी सहकार्य केले.