एस्कलेटरच्या लोकार्पणास मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:27 AM2018-06-04T00:27:39+5:302018-06-04T00:27:39+5:30
आॅगस्ट २०१७ मध्येच येथील रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटर बसविण्याचे सर्व तांत्रिक काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्याची तीनदा टेस्टींगही करण्यात आली. मात्र आज ९ महिन्यांचा कालावधी लोटूनही एस्कलेटरचे लोकार्पण करण्यास रेल्वे प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचाच प्रकार दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आॅगस्ट २०१७ मध्येच येथील रेल्वे स्थानकाच्या होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटर बसविण्याचे सर्व तांत्रिक काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्याची तीनदा टेस्टींगही करण्यात आली. मात्र आज ९ महिन्यांचा कालावधी लोटूनही एस्कलेटरचे लोकार्पण करण्यास रेल्वे प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचाच प्रकार दिसून येत आहे.
तत्कालीन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते रेल्वे स्थानकावरील विस्तीर्ण अशा शेड बांधकामाच्या भूमिपूजनासह एस्कलेटरच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले होते. शेडचे काम पूर्ण होवून त्याचे लोकार्पण होण्यास वर्षभराचा कालावधीसुद्धा लोटला आहे. त्यानंतर एस्कलेटरचे काम आॅगस्ट २०१७ मध्ये पूर्ण झाले. आता टेस्टींग करून एस्कलेटरची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.
होमप्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या एस्कलेटरची प्रथम तपासणी करण्यात आली, मात्र त्यानंतर हे यंत्र बंदच ठेवण्यात आले. याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांकडे चौकशी केल्यावर त्यांनी, एस्कलेटरवर वजन ठेवून टेस्टींग करण्यात येईल, त्यानंतरच ही सुविधा प्रवाशांसाठी मोकळी करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र ही दुसरी तपासणी झाल्यावरही एस्कलेटरची सोय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली नाही. पुन्हा याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांकडे विचारपूस केली असता पुन्हा टेस्टींग केल्यानंतरच सुरू होईल, असे सांगितले. आता दोन आठवड्यापूर्वीच संपूर्ण दिवसभर एस्कलेटर सुरू ठेवून तिसऱ्यांदा चाचणी घेण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा यंत्र बंदच ठेवण्यात आले. आता या प्रकाराला ९ महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे.
गोंदिया स्थानकावर एस्कलेटर सुरू व्हावे, प्रवाशांना त्याचा लाभ व आनंद घेता यावा, यासाठी गोंदियावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाला एस्कलेटरचे लोकार्पण करण्यास ९ महिन्यांपासून मुहूर्तच सापडत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
डीसीएम ठरविणार मुहूर्त
एस्कलेटरच्या फिटींगचे काम पूर्ण झाले असून ९ महिने झाले आहेत. आवश्यकता टेस्टींग तीन वेळा करण्यात आला. मात्र तरीही लोकार्पण होत नसल्याने नेमका काय प्रकार सुरू आहे, याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांना विचारणा करण्यात आली. यात त्यांनी रेल्वेचे सिनीयर डीसीएम लोकार्पणाची तारीख कधी व कोणती ठरवितात त्यावर अवलंबून आहे असे सांगीतले.