धनगर आणि अन्य जनजातींना आदिवासी प्रवर्गात स्थान देऊ नका
By admin | Published: September 9, 2014 11:48 PM2014-09-09T23:48:20+5:302014-09-09T23:48:20+5:30
इंडिया आदिवासी पिपल फेडरेशन शाखा तिरोडाच्या वतीने ६ सप्टेंबरला तहसील कार्यालय तिरोडा येथे मोर्चा काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रधानमंत्री, आदिवासी मंत्री यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार
इंदोरा/बुज. : इंडिया आदिवासी पिपल फेडरेशन शाखा तिरोडाच्या वतीने ६ सप्टेंबरला तहसील कार्यालय तिरोडा येथे मोर्चा काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रधानमंत्री, आदिवासी मंत्री यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील आदिवासीमध्ये धनगर व इतर काही जातीचा समावेश करण्यात यावा, असे काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सरकारवर धरणे आंदोलन करून दबाव आणत आहेत. आदिवासी समाजावर होणारा अन्याय आदिवासी बांधव कधीही सहन करणार नाही. महाराष्ट्र राज्यातील धनगर व इतर जातीचा आदिवासीच्या प्रथा, परंपरा रितीरीवाज व संस्कृतीशी कोणताही संबंध जुळत नाही. त्यांच्या व्यावसायीक जाती आहेत. खरे आदिवासी अजूनही अल्पशिक्षित, राजकारणाने दुबळे, बेरोजगार व नक्षलग्रस्त समस्यांने वेढलेले असल्याने धनगर व इतर जाती आदिवासीच्या नोकऱ्या सोयी सवलती व राजकीय पद बळकावण्यासाठीच आदिवासीच्या अनु.जमाती प्रवर्गात सहभागी होण्याचा षडयंत्र करीत आहेत.
या विरोधात महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने धनगर व इतर जातींना अनु.जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये व खऱ्या आदिवासींच्या अस्मीतेचे व आरक्षणाचे रक्षण करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संजय धुर्वे, जगन धुर्वे, दुर्गेश कळपती, नरेश धुर्वे, गोपालसिंह उईके, फुलचंद सिडामे, अनसूया इळपाते, मुन्ना सलाम, सुरेश कुंभरे, राकेश पंधरे, नितीन उईके, आनंद मरस्कोल्हे, यशवंतराव परतेती, हरिचंद टेकाम, राधेशाम किरसान, वसंत टेकाम, बेनीलाल पंधरे, घनशाम मरस्कोल्हे, बी.डी. कुरसुंगे, टी.एम. मडावी, झामसिंग भोयर, एस.जी. इळवाते आदी समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)