लाखोंची योजना पाणी देईना
By admin | Published: October 9, 2015 02:13 AM2015-10-09T02:13:45+5:302015-10-09T02:13:45+5:30
अर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले.
ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : नळ लागले पण पाणी येत नाही, टाकीवर लाखोंचा खर्च
विजेंद्र मेश्राम खातिया
अर्जुनी गावात पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदियाच्या वतीने ६५ हजार लिटर क्षमतेचे सन २०१३-१४ मध्ये लाखो रूपये खर्चून जलकुंभ तयार करण्यात आले. गावात घरोघरी नळांची जोडणीसुद्धा करण्यात आली. मात्र या नळांद्वारे पिण्याचे शुद्ध पाणीच मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याची मोठीच समस्या उद्भवली आहे. यात पाईप लाईनची फिटिंगच चुकीची करण्यात आल्याने अनेकांच्या घरी नळांना पाणीच येत नाही.
गावात एकूण ३५४ नळ जोडण्या आहेत. आजही अनेक लोक नळ कनेक्शन घेत आहेत. मात्र पाणीच मिळत नसल्याने गावकरी त्रस्त होवून गेले आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यासाठी शासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून जलकुंभ तयार करण्यात येत आहेत. परंतु पाणी पुरवठा योजनेच्या क्रियान्वयनाबाबत प्रशासन सजग नसल्यामुळे पाणी टंचाई भासत आहे. याचा परिणाम ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
सदर समस्येबाबत गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितले आहे. परंतु या समस्येचे निवारण अद्यापही करण्यात न आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गजभिये यांनी सांगितले की, सन २०१३-१४ मध्ये सदर जलकुंभ तयार करण्यात आला. त्याची क्षमता ६५ हजार लिटरची आहे. या जलकुंभामधून नळ जोडण्या लावण्यात आल्या. मात्र अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या घरी नळापर्यंत पाणी पोहोचतच नाही. तसेच अनेक ठिकाणातून पाईप लाईन फुटून पाणी बेवारस पाणी जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकाराबाबत गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. जर ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार नाही, तर कोण देईल? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. सदर समस्या त्वरित सोडवून नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यात यावे, अशी मागणी अर्जुनीवासीयांनी केली आहे.