गोंदियाचा बिहार करू नका...

By admin | Published: April 20, 2016 01:57 AM2016-04-20T01:57:13+5:302016-04-20T01:57:13+5:30

गेल्या १० दिवसात गोंदिया शहरातील दोन मोठ्या घटना आणि त्याचे पडलेले पडसाद, त्यातून निर्माण झालेला तणाव,....

Do not make Gondiya Bihar ... | गोंदियाचा बिहार करू नका...

गोंदियाचा बिहार करू नका...

Next

मनोज ताजने गोंदिया
गेल्या १० दिवसात गोंदिया शहरातील दोन मोठ्या घटना आणि त्याचे पडलेले पडसाद, त्यातून निर्माण झालेला तणाव, भीती हे पाहिल्यानंतर आपण महाराष्ट्रात आहो की बिहारमध्ये? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. राज्यातील एका वरिष्ठ आमदाराला सर्वांसमक्ष होणारी मारहाण असो की पोलिसांच्या सुरक्षेत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नगरसेवकावर गोळीबार करून आरोपींचे सहजपणे पळून जाणे असो, शहरातील कायदा व सुव्यवस्था पोलिसांच्या अवाक्यात राहिली नाही, हेच या घटनाक्रमांवरून दिसून येत आहे.
महाराष्ट्रात समाविष्ठ होऊन गोंदियाला ५६ वर्षे झाली असली तरी गोंदिया शहरावर छत्तीसगड-मध्यप्रदेशच्या संस्कृतीचा पगडा अजूनही कायम असल्याचे वेळोवेळी दिसून येते. पण राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा महाराष्ट्राची आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशीच त्यांची पकड असावी अशी रास्त अपेक्षा आहे. पण शहरातील या घटना पाहता पोलीस यंत्रणेची पकड ढिली झाली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
गेल्या ९ तारखेला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. राजकारणात राग व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात तरी अशा पद्धतीने एखाद्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीच्या अंगावर धावून जाऊन मारहाण करणे, कपडे फाडणे, शिविगाळ करणे शोभणारे नाही. आधी मारहाणीचे वृत्त ऐकून कानावर विश्वास न ठेवणाऱ्यांनी नंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपिंग्जमधून ही मारहाण पाहिली. त्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी गोंदिया शहरात बंद पुकारला. आजही या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर आहेत.
या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी न.प.उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर पोलिसांसमक्ष गोळीबार करून आरोपी निघून गेले. यात यादव थोडक्यात बचावले. ईमलाह हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे चार-चार पोलिसांच्या पहाऱ्यात असलेल्या यादव यांच्यावर गोळीबार करण्याची हिंमत एखाद्याने करावी, हे आरोपी शिरजोर झाल्याचे द्योतक आहे, की पोलीस कमजोर झाल्याचे, हे त्यांचे त्यांनीच ठरवले पाहीजे. काहीही असले तरी शहरातील हे बिघडत चाललेले वातावरण नागरिकांच्या दृष्टीने असुरक्षित झाले आहे. भांडण, हल्ले हे कोणावरही झाले तरी त्याचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो. बंद पाळण्याच्या निमित्ताने होणारी गैरसोय, प्रसंगी त्यासाठी होणारा बळाचा वापर यामुळे सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो. शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली जाते. शाळकरी कोवळ्या मुलांवर चांगल्या गोष्टीचे संस्कार पडण्याऐवजी गँगवार कसे झाले, त्यामुळे शाळेला सुटी कशी मिळाली हे ऐकण्याची वेळ येते तेव्हा याचे दुरगामी परिणाम नजरेसमोर दिसू लागतात.
पंकज यादववरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या तीन अवघ्या १९-२० वर्षाच्या पोरांना अटक केली. यातील एक तर अल्पवयीन आहे. प्रत्यक्ष गोळी चालविणारा वेगळाच असला तरी या पोरांचाही त्यात हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. असेलही कदाचित, पण ते तर मोहरे आहेत. हा हल्ला कोणी करवून घेतला त्याचाही शोध पोलिसांनी लवकर घेतला पाहीजे. पोलिसांनी आताही जर कडक पावले उचलली नाही तर हे वातावरण आणखी बिघडत जाणार आणि परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. गोंदियाचे बिहार होण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या एसी केबिनच्या बाहेर पडून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, एवढीच गोंदियावासीयांची अपेक्षा आहे.

Web Title: Do not make Gondiya Bihar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.