हत्तींच्या कळपाच्या मार्गात अडथळा निर्माण करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 11:00 PM2022-09-27T23:00:48+5:302022-09-27T23:01:32+5:30
हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाढवी नदी मार्गे २४ सप्टेंबरला प्रवेश करून वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करताना शेत शिवारातून बऱ्याचदा जातात. परिणामी शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी हत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास त्वरित वन कर्मचाऱ्यांशी किंवा वन कार्यालयाशी संपर्क करून नुकसानीबाबतचे अर्ज सादर करावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हत्तींचा कळप २५ सप्टेंबर रोजी रात्री अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील खोळदावरून बंद्या, महागाव, सिरोली नहर मार्गे बुटाई नहरापर्यंत आला. नंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता अर्जुनी मोरगावसह-वनक्षेत्रातील बिट रामघाट १ कक्ष क्रमांक २५३ राखीव वनात प्रतापगड पहाडीवर हत्तींचे प्रत्यक्ष दर्शन झाले. सध्याचे स्थळ निरीक्षण केले असता, अंदाजे तीन मार्गांवरून हत्तींचे मार्गक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गोंदिया वनविभागामार्फत गस्तीचे व बंदोबस्ताचे नियोजन केले. ज्या मार्गावरून हत्तीचा कळप जात असेल त्यात अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना वन विभागाने केला आहे.
हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाढवी नदी मार्गे २४ सप्टेंबरला प्रवेश करून वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करताना शेत शिवारातून बऱ्याचदा जातात. परिणामी शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी हत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास त्वरित वन कर्मचाऱ्यांशी किंवा वन कार्यालयाशी संपर्क करून नुकसानीबाबतचे अर्ज सादर करावे. वनविभागाकडून झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी दिली. जिल्ह्यात जंगली हत्तीचे आगमन अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांसाठी पर्वणीच ठरले आहे. मात्र नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त असल्याने त्यांना हे हत्ती नकोसे झाले आहेत.
पश्चिम बंगालमधील हत्ती नियंत्रण पथक दाखल
बुटाई, खैरी, सुकळी, बाराभाटी, कवठा, एरंडी, प्रतापगड, गोठणगांव, तिबेट कॅम्प, चिचोली, दिनकर नगर, कालीमाती, डोंगरगाव, कोहलगाव, जब्बारखेडा, धाबेपवनी मार्गे नवेगाव नॅशनल पार्क. हत्तींच्या नियंत्रणाकरिता रॅपिड रिस्पॉन्स टिम, नवेगावबांध, गोठणगाव अर्जुनी मोरगाव या तिन्ही वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी, विशेष व्याघ्र संरक्षण दल, पश्चिम बंगालमधील हत्ती नियंत्रण पथक यांचे संयुक्तपणे नियोजन केलेले आहे.
तर हत्ती बिथरू शकतात
हत्ती एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वन क्षेत्रात मार्गक्रमण करतो व हे त्याचे नैसर्गिक आचरण असून अशा परिस्थितीत मानवी हस्तक्षेप त्याचे मार्गक्रमात न झाल्यास हत्ती शांततेत निघून जातात. हत्ती मार्गक्रमण करताना शेतशिवारातून बऱ्याचदा जातात अशावेळी शेतातील पिकांचे नुकसान होते. नागरिकांनी संयमाने हत्तींना त्यांचे मार्गक्रमणात सहकार्य करावे.
वनविभागाला द्या त्वरित माहिती
गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या कळपात लहान पिल्ले असल्याने मोठे हत्ती मानवी हस्तक्षेपामुळे बिथरू शकतात. हत्ती बिथरल्यास नियंत्रणात आणने कठीण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हत्तींच्या जवळ जाऊ नये, स्थानिक वनकर्मचाऱ्यांव्दारा वेळो-वेळी मिळालेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घाबरू नये. हत्तींची आपल्या क्षेत्रात हलचल आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी.
या सूचनांचे करा पालन
सायंकाळी सूर्यास्तानंतर शेतात एकट्याने थांबू नये. रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जागणीकरिता जाऊ नये. हत्तींचा पाठलाग करू नये. हत्तीला बघण्यासाठी अथवा कुठल्याही कारणास्तव हत्तींच्या जवळ जाऊ नये. शेत पिकांचे नुकसान झाल्यास तत्काळ अर्ज करावे, वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येईल. हत्तींच्या मार्गांमध्ये अडथळा केल्यास तो जास्त विध्वंसक होतो, त्यामध्ये नुकसान टाळण्याकरिता खबरदारी घ्यावी.