कर्जाची परतफेड करु नका!
By admin | Published: February 14, 2017 01:05 AM2017-02-14T01:05:32+5:302017-02-14T01:05:32+5:30
तालुक्यातील ज्या महिलांनी कर्ज घेतले आहे व कपंनीने दिले आहे, अशा सर्व कंपन्या परप्रांतीय आहेत. कर्ज दिले कसे? त्यांना अधिकार आहे का?
सुनील सूर्यवंशी : तिरोडा येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन
तिरोडा : तालुक्यातील ज्या महिलांनी कर्ज घेतले आहे व कपंनीने दिले आहे, अशा सर्व कंपन्या परप्रांतीय आहेत. कर्ज दिले कसे? त्यांना अधिकार आहे का? बचत गट तयार करण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले? आपल्या राज्यातील एकही कंपनी नाही व रिझर्व्ह बँकची मान्यता नाही. व्याजदर आरबीआय एवढे नसून महिलांची फसवणूक होत असेल तर महिलांनी कर्जाची परतफेड करु नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.
तिरोडा येथील झरारीया मंगल कार्यालयात तालुकास्तरीय महिला मेळावा घेण्यात आला. या महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी सूर्यवंशी बोलत होते.
सूर्यवंशी पुढे म्हणाले, मायक्रो फायनान्स कंपन्यांबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यात गैरप्रकार आढळल्यास कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करु व तसा अहवाल शासनाला पाठवू, असे सांगून त्यांनी महिलांना आश्वस्त केले.
अध्यक्षस्थानी तिरोडा पंचायत समिती सभापती उषा किंदरले होत्या. प्रमुख वक्ते व अतिथी म्हणून अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, मंदा पराते, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती अॅड. टी.बी. कटरे, उपसभापती किशोर पारधी व महिला उपस्थित होत्या.
खांदेवाले यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांनी दिलेले कागदपत्र बघून सांगितले की, पैशाची परतफेड करु नका. या कंपनीकडे पैसा आला कुठून व त्यांनी घरोघरी जावून महिलांनाच कर्जाचे वाटप कसे केले? कुणीही महिला त्यांच्याकडे गेली नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा होता तो पांढरा करण्यासाठी तेही २३ ते २७ टक्के व्याजदराने दिले.
एवढा व्याजदर कुठेही नाही. पैसे कुणीही भरु नका. आपण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठवित आहो. संपूर्ण पैसे माफ होणार असल्याचे खांदेवाले यांनी महिलांना आवार्जून सांगितले.
इतर उपस्थित मान्यवरांनीसुद्धा महिलांना मार्गदर्शन केले. पैसे वसुलीसाठी आले किंवा महिलांना धमकावण्याचा प्रयत्न केला तर पोलिसात तक्रार करावी, असे महिलांचे नेतृत्व करणाऱ्या मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अॅड. माधुरी रहांगडाले यांनी सांगितले. सतेच तसी तक्रार माझ्याकडे द्यावी, असे आवाहन महिलांना केले.
प्रास्ताविक व संचालन अॅड. माधुरी रहांगडाले यांनी केले. आभार परवीन शेख यांनी मानले. कार्यक्रमासाठी रूबिना कुरेशी, रानी, अर्चना नखाते, सुनिता पटले, सुनिता पारधी, मंदाकिनी गाढवे व महिलांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)