कोट्यवधीचा वेळ दीड जीबी फ्री नेटवर घालवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:54 AM2019-02-13T00:54:56+5:302019-02-13T00:55:48+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा केंद्रबिंदूच तरूण आहे. राष्ट्रसंत आपल्या भजनात, भाषणात मित्र हो, मित्रा चाल पुढे देशाचे काम करायला, नवजवान जाग जाना रे असे सांगतात. तरूणांनो ज्या देशाची धुरा तुमच्या हातात आहे. त्यासाठी रोमँटीक होऊन बासरी वाजवू नका तर विराचा शंख तुमच्यातून निघायला हवा असे राष्ट्रसंतांना अभिप्रेत आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा केंद्रबिंदूच तरूण आहे. राष्ट्रसंत आपल्या भजनात, भाषणात मित्र हो, मित्रा चाल पुढे देशाचे काम करायला, नवजवान जाग जाना रे असे सांगतात. तरूणांनो ज्या देशाची धुरा तुमच्या हातात आहे. त्यासाठी रोमँटीक होऊन बासरी वाजवू नका तर विराचा शंख तुमच्यातून निघायला हवा असे राष्ट्रसंतांना अभिप्रेत आहे. धन मे है धन चारित्र्य धन, बढायेंगे कैसे,यावर भर देणाऱ्या राष्ट्रसंतानी चारित्र्य निर्माण करा व ते चारीत्र्य समाजोपयोगी पडेल असे करा. त्या चारित्र्याला राजकारणाचा रंग लागू न देता सामाजिक दृष्टीमध्ये स्थिर ठेवा. तरूणांनो आपला लाखो, कोट्यवधीचा वेळ पानटपरीवर, दीड जीबी फ्री नेटवर, किंवा एखाद्याची टिंगल करण्यावर खर्ची न घालता आपले आयुष्य घडविण्यासाठी खर्च करा असा सल्ला श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक प्रशांत गजानन ठाकरे यांनी दिला आहे. आमगावच्या पदमपूर येथे आयोजित भागवत सप्ताहानिमीत्त आले असता ते लोकमतशी बोलत होते.
पुणे विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए.करणाºया प्रशांत ठाकरे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. ठाकरे वर्ग ८ वीत असताना त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायीक प्रार्थनेची ओढ लागली. ऋषी घुसरकर महाराज, वेरूळकर गुरूजी, राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून श्री गुरूदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर घेत होते. त्यातूनच त्यांची गोडी वाढली. प्रार्थना केल्याशिवाय त्यांच्या घरात स्वंपाक बनत नाही. वडीलही गुरूदेव प्रेमी आहेत. त्यांनी पहिल्यांदा ग्रामगीता वाचली तर ती ग्रेट वाढली. त्यातून ते गुरूदेव सेवा मंडळाकडे वळले. त्यांनी आत्तापर्यंत हजारो कीर्तन केले. दरवर्षी २०० च्या घरात कीर्तनाचे कार्यक्रम करतात.शिवाजी कॉलेज अकोला येथे तासीका तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रसंताच्या संदर्भात सांगतांना ते म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सर्वधर्माचे, तत्वाचे तत्त्व मिमांशक होते. टोकाची भूमिका घेणारेही लोक महाराजांकडे जात होते. महाराजांना कॉम्रेड डांगे आणि संघाचे गोळवलकर गुरूजी ही मानत होते. राष्ट्रसंत विश्वहिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला व तमाशाच्या उदघाटनालाही जात असत. ‘मै प्रेम का भृंग हू, सतप्रेम का सतनेमका’ इस्लाम के मस्जीद मे जाकर बैठा हू मै, हिंदूओ के संतोके चरणो का रस लुटा हू मै, कई गिरजा घरो मे सुनी मैने, येशू की वंदना, बुध्द से भी की मैने वंदना’ असा सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे मानवतेचे महापुजारी राष्टÑसंत तुकडोजी महाराज म्हणत की, ईश्वराच्या नावाने माणसे वाटली जात असतील तर तो ईश्वर मला नको, ज्या ईश्वराच्या अधिपत्याखाली माणस एकत्र येतात. तिथे ईश्वर नसला तरी मला चालेल. आपण मुलाला इंजिनीअर बनायला जरूर सांगा, परंतु तो माणूस बनून इंजिनीअर झाला पाहिजे. त्याची मशनरी होऊ नये, त्याच्यामधील संवेदना, आपुलकी, माणूसकी नष्ट होऊ नये, समाजाच्या नीतीतत्वाची जाणीव त्याच्या तत्वात असली पाहिजे.आता फेसबुकमध्ये पब्जी सारखे गेम आले आहेत. तरूण त्याच्या आहारी जात आहेत.आजघडीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे मंडळे वाढलीत, बाबासाहेबांची जयंती साजरी करणारे तरूण वाढले, पुण्यतिथीला येऊन जयगुरू म्हणणारे तरूणही वाढतच आहेत. परंतु तरूणांच्याच हातूनच विध्वंसक कार्य होत आहे. याचे सोपे उत्तर असे आहे की, काही चमकणाऱ्या (आकर्षणाकडे) वस्तूकडे तरूण वळत आहे. परंतु त्याच्या मागील तत्व ते तपासत नाही. शिवाजी महाराजांची जयंतीची रॅली बहुजन प्रतिपालासाठी काढली पाहिजे.महापुरूषांना उत्सवी बनविण्यासाठी त्यांची जयंती नसून आपल्या जीवनाचा उत्सव व्हावा यासाठी महापुरूष आहेत. हे जेव्हा समजेल तेव्हा त्या तरूणांचा व्यक्तीमत्व विकास झालेला असेल. दाढी वाढून शिवाजी महाराजांचे अनुकरण करण्यापेक्षा विचारांचे अनुकरण करावेत.