नियमित करा योग, राहा सदैव निरोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:20 AM2021-06-21T04:20:22+5:302021-06-21T04:20:22+5:30
गोंदिया : दररोजची धावपळ आणि तणाव या गोष्टींचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यातूनच मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या ...
गोंदिया : दररोजची धावपळ आणि तणाव या गोष्टींचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यातूनच मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. या आजारांवर वेळीच उपचार न केल्याने त्याचेच रूपातंर पुढे दुर्धर आजारात होत आहे. यामागील कारणे म्हणजे आळशी प्रवृत्ती, व्यायामाकडे दुर्लक्ष या गोष्टी आहेत. मात्र, या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे योग आहे. नियमित योग केल्याने मन प्रफुल्लित राहते. शिवाय शरीरसुद्धा तंदुरुस्त राहत असल्याने निरोगी राहता येत असल्याचे योग शिक्षिका डॉ. माधुरी परमार यांनी सांगितले. योगासनांचे विविध प्रकार असून, त्यांचे वेगवेगळे फायदेदेखील आहेत.
....
प्राणायाम : प्राण या शब्दाचा अर्थ शक्ती, आयाम या शब्दाचा अर्थ नियंत्रण, प्राणायाम नेहमी शुद्ध वातावरणात केला जातो. प्राणायाम केल्यामुळे शारीरिक, मानसिक विकार दूर होतात. प्राणायामामुळे आंतरिक शक्ती वाढते. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी प्राणायाम रामबाण उपाय आहे. उत्तम आरोग्यासाठी परफेक्ट औषधी आहे. प्राणायामामुळे आरोग्य सुदृढ राहते, मन शांत होते, विचार सकारात्मक होतात. ऑक्सिजन लेव्हल बरोबर राहते, बीपी, शुगर, अस्थमा या संपूर्ण आजारांवर ही पॉवरफुल औषधी आहे.
.....
अनुलोम विलोम प्राणायाम
अनुलोम (पूरक), विलोम म्हणजे (रेचक) हा प्राणायाम शुद्ध वातावरणात करायला पाहिजे. पूरक व रेचक ही प्रक्रिया म्हणजे उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास घ्यायचा असतो, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा असतो, उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन डावीने रेचक करायचा असतो. अनुलोम विलोम प्राणायमाने शरीराचा रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. ऑक्सिजन लेव्हल वाढते, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. अस्थमा, सर्दी, सायनस यासारखे सर्व विकार दूर होतात. मन शांत होते. आंतरिक शक्ती वाढते.
.........
भ्रामरी प्राणायाम
भ्रामरी शब्द भ्रमरपासून बनलेला आहे. याचा अर्थ भवरा कोणत्याही ध्यानात्मक आसनात भ्रामणी प्राणायाम करता येतो. भ्रामरी प्राणायाम केल्याने चिंता, क्रोध, राग, द्वेष, तणाव दूर होतो. मानसिक ताणतणाव दूर होतो. स्मरणशक्ती वाढते, डोळ्याचे विकारसुद्धा दूर होतात, एकाग्रता वाढते.
.....
उज्जायी प्राणायाम
उज्जायी प्राणायामामुळे गळ्याचे विकार दूर होतात. कोविड रुग्णांसाठी सर्वांत उत्तम हे प्राणायाम आहे. या प्राणायामाने श्वसनाचे सर्व विकार दूर होतात.
.....
ध्यान
ध्यान अष्टांग योगाचे सातवे अंग आहे. ध्यान हे सर्वांसाठी फार महत्त्वाचे आहे. ध्यान केल्याने मन शांत होते. राग, द्वेष आदी विकार दूर होतात. आपले विचार सकारात्मक होतात. मानसिक तणाव दूर होतो. विद्यार्थी जीवनात फार महत्त्वाचा ध्यान असतो. ध्यानामुळे एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी दररोज वीस मिनिटे ध्यान करायला पाहिजे. ध्यान हे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच करता येतो. मुलांना लहानपणापासूनच ध्यान करायची सवय लावायला पाहिजे.
..........
कोविडकाळात दहा रुग्णांना योगाचे धडे
कोविड संसर्गकाळात माधुरी परमार यांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या १० हजारांवर रुग्णांना योगाचे धडे दिले. कोविड रुग्णांना नियमित योगा करण्याचे फायदे काय आहेत. त्यांनी कोणत्या प्रकारचे योगासने केले पाहिजेत, याची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्याचे काम केले.