पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:10+5:302021-09-19T04:30:10+5:30
गोंदिया : डी.एड., बी.एड. करूनसुद्धा नोकरी मिळत नसल्याने मागील तीन-चार वर्षांपासून टेक्निकल एज्युकेशनकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. तांत्रिक कौशल्य ...
गोंदिया : डी.एड., बी.एड. करूनसुद्धा नोकरी मिळत नसल्याने मागील तीन-चार वर्षांपासून टेक्निकल एज्युकेशनकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. तांत्रिक कौशल्य असले तर किमान स्वयंरोजगार तरी उभारता येणार, बेरोजगार राहण्याची वेळ येणार नाही; तर टेक्निकल एज्युकेशन हे महत्त्वपूर्ण झाले असून त्यात रोजगाराच्या संधी अधिक राहत असल्याने अलीकडे याच अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी अधिक आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. पॉलिटेक्निकनंतर रोजगाराची हमी असल्याने याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. जिल्ह्यात शासकीय आणि तीन खासगी पाॅलिटेक्निक कॉलेज असून या सर्वांची एकूण प्रवेश क्षमता ९१८ आहे. आज, रविवारपासून पॉलिटेक्निकच्या प्रवेशाच्या पहिल्या राउंडला सुरुवात होत आहे. एकूण ९१८ जागांसाठी १२७३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. प्रवेशाचे एकूण तीन राउंड होणार असल्याची माहिती पाॅलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली.
..............
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयांची प्रवेश क्षमता
एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालये
०४
...........
एकूण प्रवेश क्षमता
९१८
एकूण अर्ज
१२७३
...........................
पॉलिटेक्निक महाविद्यालये
शासकीय : ०१
खासगी : ०३
....................
शासकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता
३७८
खासगी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता
५४०
.......................
मेक्याॅनिकल, सिव्हिलकडे विद्यार्थ्यांचा ओढा
अलीकडे तंत्रशिक्षणाचे महत्त्व वाढले असून पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल आणि सिव्हिल शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल वाढला आहे. याच शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. या दोन शाखांत प्रवेश मिळाल्यानंतर रोजगाराची खात्री असल्याचा समज विद्यार्थ्यांमध्ये आहे.
..............
....म्हणून पाॅलिटेक्निकला पसंती
डी.एड., बी.एड. करूनदेखील नोकरी मिळत नसल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षण घेतल्यास किमान स्वयंरोजगार तरी करता येईल. तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या संधीदेखील अधिक आहेत; त्यामुळे मी पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार आहे.
- विनय रामटेके, विद्यार्थी
.............................
अलीकडे कौशल्यावर आधारित शिक्षणालाच अधिक महत्त्व आले आहे. पाॅलिटेक्निकनंतर रोजगाराच्या अनेक संधी आहेत. शिवाय नोकरी मिळण्याचीही हमी असते. त्यामुळेच मी पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल ट्रेडला प्रवेश घेत आहे.
- सुदेश राऊत, विद्यार्थी.
..................
प्राचार्य म्हणतात
मागील तीन-चार वर्षांपासूृन पाॅलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. सिव्हिल आणि मेकॅनिकल शाखेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. शिवाय विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे महत्त्व कळायला लागले आहे.
- सी. डी. गोडघाटे, प्राचार्य, शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय.
..................
बी. ए., बी. एड. केल्यानंतरही पाच-पाच वर्षे नोकरी मिळत नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार होऊन राहावे लागते. त्यापेक्षा तंत्रशिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही तर स्वयंरोजगार तरी उभारतो येतो. ही बाब आता विद्यार्थ्यांना कळली असून त्यांचा ओढा पाॅलिटेक्निककडे वाढत आहे.
- जी. सी. राऊत, प्राचार्य
.....................