डॉक्टर साहेब माझा आरटीपीसीआर रिपोर्ट कधी येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:00 AM2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:19+5:30
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लक्षणे दिसताच वेळीच कोरोना चाचणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यापासून आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी करीत आहे. त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. सर्व स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी गोंदिया येथील मेडिकलच्या प्रयाेगशाळेत केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मला लक्षणे दिसू लागल्याने मी आठ दिवसांपूर्वी गोंदिया येथील गोविंदपूर येथील कोरोना चाचणी केंद्रावर जाऊन आरटीपीसीआर टेस्ट केली. मात्र आठ दिवस लोटूनही मला रिपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हेच कळत नसल्याने उपचार तरी कसा करणार, कुटुंबीय सुध्दा माझ्यामुळे चिंतेत आहेत. मी संबंधित केंद्रावरील कर्मचारी आणि डॉक्टरांना साहेब माझा आरटीपीसीआर रिपाेर्ट कधी येणार असे विचारतो आणि परत जातो. मागील आठ दिवसांपासून हाच प्रकार सुरू असल्याचे कोरोना चाचणी केलेल्या एका नागरिकाने सांगितले. मात्र त्यांच्या सारखीच स्थिती चाचणी केलेल्या अनेकांची आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लक्षणे दिसताच वेळीच कोरोना चाचणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यापासून आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी करीत आहे. त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. सर्व स्वॅब नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी गोंदिया येथील मेडिकलच्या प्रयाेगशाळेत केली जाते. मात्र या प्रयोगशाळेतील डॉक्टर आणि इतर कर्मचारी असे एकूण १४ जण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर नागपूर येथील मनुष्यबळ बोलावून काही प्रमाणात चाचण्या केल्या जात आहे. मात्र त्यात काही तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत (दि.२५) प्रलबिंत स्वॅब नमुन्यांची संख्या ५८३८ पोहचली आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांना आठ-आठ दिवस रिपोर्ट मिळत नसल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. तर संशयितांचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने संसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयात जाऊन चाचणी केल्यास तिथे सुध्दा दोन तीन दिवस वेटिंग आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखणार तरी कसे प्रश्न निर्माण झाला आहे.
नवीन आरटीपीसीआर मशीन येणार तरी कधी?
पालकमंत्री नबाव मलिक यांनी १६ एप्रिल रोजी गोंदिया येथे आढावा बैठक घेऊन आठ दिवसात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. पालकमंत्र्यांनी स्वत: आठ दिवसात नवीन आरटीपीसीआर मशीन मेडिकलच्या प्रयोगशाळेत लावण्याची ग्वाही दिली होती. याला आता आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. पण अद्यापही आरटीपीसीआर मशीन आली नाही. मग जिल्हावासीयांनी आता कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोविड केअर सेंटरमधील कुलर केव्हा सुरू होणार
कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. मात्र तिथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला असला तरी अद्यापही काही कोविड केअर सेंटरमधील कुलरचे स्वीच ऑन झाले नाही. स्वच्छतेचा तर पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे सुध्दा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.