कोरोनाच्या ताणाने घटले डॉक्टरांचे वजन ! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:15+5:302021-05-26T04:30:15+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाकाळात कामाचा वाढलेला ताण, ...
गोंदिया : कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाकाळात कामाचा वाढलेला ताण, त्यामुळे होत असलेली धावपळ यासह अन्य कारणांमुळे डॉक्टरांचे वजन घटले आहे. अनेक डॉक्टर आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सकस आहार, मॉर्निंग वॉक, मेडिटेशन, योगा-प्राणायाम आणि नियमित व्यायामावर भर देताना दिसून येत आहेत.
मागील वर्षभरापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. यंदाही हे संकट कायम असून मार्च महिन्यापासून कारोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयात आधीच अपुरे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. अनेक महत्त्वाच्या डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने कार्यरत डॉक्टरांवर कामाचा मोठा ताण आहे. अशा स्थितीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेला प्राधान्य देत कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोना संसर्गाच्या या काळात अनेक डॉक्टरांना १२ तासांपेक्षा अधिक तास काम करावे लागत आहे. या संकटकाळात कामाचा वाढलेला ताण, त्यामुळे होणारी धावपळ यामुळे डॉक्टरांचे स्वत:च्या आरोग्यासह कुटुंबीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अनेक डॉक्टरांचे ४ ते ६ किलोने वजन घटले आहे. आरोग्यासाठी डॉक्टर, सकस आहार, योगा-प्राणायाम, ध्यान, नियमित व्यायामावर भर देत आहेत.
.....................................
आहाराची घेतात काळजी
१) कोरोनामुळे अनेक डॉक्टर १२ तासांपेक्षा अधिक तास काम करीत आहेत. यामुळे आरोग्यविषयक नियोजन बिघडले आहे.
२) आरोग्यासाठी बहुतांश डॉक्टर सकस आहार, पुरेशी झोप घेणे, योगा-प्राणायाम करणे, पहाटे फिरायला जाणे, नियमित व्यायाम करणे आदींकडे वळले आहेत.
तर काही डॉक्टर फळांचा ताजा रस, प्रोटिनयुक्त भाजीपाला, मांस व अंडीचे सेवन करतात.
३)काही डॉक्टर षट्कर्म शिबिर, नियमित धावायला जाणे, नियमित अर्धा तासभर ध्यान करणे, सकाळी मोड आलेले कडधान्य खाण्याचे प्रयोग करीत आहेत.
............................................
कोरोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून कामाचा ताण वाढला आहे. यामुळे धावपळ होणे साहजिक बाब आहे. मात्र, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. तर आरोग्य हीच संपत्ती आहे. ते सदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करीत असून सकस आहारावर भर देत आहे.
-डॉ. सायास केंद्रे , स्त्री रोग तज्ज्ञ गोंदिया.
..............................................
मागील वर्षभरापासून धावपळ होत असून स्वत:च्या आरोग्यासोबत कुटुंबीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. वजन कमी झाले आहे. सकस आहार घेण्यासह, योगा-प्राणायामावर भर दिला जात आहे.
-डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, गोंदिया.
................................................
कोरोनामुळे कामाचा ताण, कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष त्यामुळे वजन कमी झाले. सोबतच संकरीत आहार सुरूच आहे. कोरोनाच्या काळात रूग्ण सेवेबरोबर स्वत:चीही काळजी घेणे आवश्यक आहे.
ङॉ. अविनाश येळणे, वैद्यकीय अधिकारी गोंदिया.
.....................
जिल्ह्यात सरकारी रूग्णालय - १४
डॉक्टरांची संख्या- १००
आरोग्य कर्मचारी ३०००