विद्यार्थ्यांसाठी दारोदारी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:30 PM2019-05-26T23:30:28+5:302019-05-26T23:30:56+5:30
शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे व इंग्रजी शाळांच्या वाढत्या अस्तित्वामुळे प्रस्थापित मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका शहरी व ग्रामीण भागातील शाळा व कार्यरत शिक्षकांना बसत आहे. नोकरीच्या अर्ध्या काळातच बेरोजगार होण्याची व नोकरी जाण्याची भिती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे व इंग्रजी शाळांच्या वाढत्या अस्तित्वामुळे प्रस्थापित मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याचा फटका शहरी व ग्रामीण भागातील शाळा व कार्यरत शिक्षकांना बसत आहे. नोकरीच्या अर्ध्या काळातच बेरोजगार होण्याची व नोकरी जाण्याची भिती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. स्वत:च्या नोकरी सोबतच शाळेचेही अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक उन्हाळ्याच्या भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गल्लोगल्ली भटकत आहेत. विद्यार्थी मिळविण्यासाठी वाट्टेल ते मार्गर् स्विकारून जणू विद्यार्थी खरेदी करण्याचा प्रकार सध्या दिसून येत आहे.
जिल्ह्यात अनेक खाजगी माध्यमिक शाळा असून, तुलनेत विद्यार्थी संख्या कमी पडत आहे. याचा सर्वात जास्त फटका अनुदानित शाळांना बसत आहे. विद्यार्थ्यांची टी.सी. हातात मिळण्याच्या पूर्वीपासून सायकल, गणवेश, पुस्तके, नोटबुक्स व पैसे सुद्धा पालकांच्या हातात दिले जात असल्याचे बोलले जात आहे.
गरीब, अशिक्षित, अल्पशिक्षित पालकांना भुरळ घालून, खोटी आश्वासने देवून, विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षिक करीत आहेत. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची शाळा सोडून, आपल्या शाळेत, बाहेरगावी विद्यार्थी शिकण्यास, अनेक शिक्षक पालकांना भाग पाडत आहेत. पालकांच्या गरिबी व अल्पशिक्षितपणाचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात बाहेरील शिक्षक दिसत आहेत.
दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देण्याऐवजी हे शिक्षक बस व्यवस्था, सायकल, गणवेश, पैसा या बाबी देवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. पालक मात्र सायकल, गणवेश, बस सुविधा, नोटबुक्स व रोख पैशांच्या मोबदल्यात स्वत:च्या मुलाची जणु विक्रीच करतो असे चित्र सध्या गावांगावात दिसून येत आहे. स्थानिक शाळांतील शिक्षक स्वत:च्या शाळेचा दर्जा व गुणवत्ता याविषयी बोलतात. प्रामाणिकपणे पटवून देण्याचा प्रयत्न करतात पण याबाबी पालकांच्या पचनी पडत नाहीत. मुलांच्या भवितव्याविषयी पालकांनी सुज्ञपणे विचार करून जागृत होण्याची गरज आहे. शिक्षकांच्या भुलथापांना बळी न पडता, वर्षभर विविध सहशालेय उपक्रम राबवणारे, मेहनत घेणारी, आधुनिक काळानुसार संगणकीय शिक्षणाचे धडे देणारी, बोर्ड परिक्षांमध्ये उत्कृष्ट परंपरा असलेली, शाळा निवड करणे, पालकांनी गरजेचे आहे. शैक्षणिक बाबीसोडून इतर अनावश्यक बाबींच्या लॉलीपॉपवर पालकांनी भुलू नये, अशी सुज्ञ पालकांमध्ये चर्चा आहे.