प्लास्टिक जाळताय? धुरामुळे कॅन्सर, फुप्फुसाच्या आजाराचा वाढतोय धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 05:19 PM2024-10-18T17:19:54+5:302024-10-18T17:20:41+5:30
डॉक्टरांचा सल्ला: सकाळी कचरा जाळणे थांबवा, बालकांना धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात येतो. हाच प्रकार कर्करोग अन् फुप्फुसाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कचरा जाळत असाल, तर हा प्रकार थांबवा, असा सल्लातज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
शहरातील एरव्ही डम्पिंग ग्राउंडवर शहरातील गोळा झालेला कचरा जाळण्यात येत होता. तर घरात साचलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या अनेक जण जाळतात. त्यातून निघणारा क्लोरिनेटेड घटक मोठ्या प्रमाणात असतो. तो मानवी यकृत, फुप्फुसावर घातक परिणाम करण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे घरातील कचरा किंवा प्लास्टिकचा कचरा न जाळता तो कचरा गाडीतच टाकावा, जेणेकरून आपल्याला किंवा आपल्या परिवाराला यातून कोणताही आजार जडणार नाहीत, असे तज्ज्ञांनी सांगितले.
डम्पिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या नागरिकांची होत होती अडचण
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागा- ड्यांद्वारे शहरातील कचऱ्याचे संकलन करण्यात येते. पूर्वी गणेश नगर परिसरातील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकला जात होता व तेथेच त्याला जाळले जात होते. परिणामी त्यातून निघणारा धूर परिसरात पसरत असल्याने गणेशनगर व परि- सरातील नागरिकांना त्रास होऊन विविध आजारांना सामोरे जावे लागत होते. मात्र या समस्येला घेऊन आंदोलन करण्यात आले व त्यानंतर हा प्रकार संपुष्टात आला. मात्र शहरात ठिकठिकाणी कचऱ्याला जाळण्याचे प्रकार काही संपलेले नाही.
प्लास्टिक कचरा जाळणे अधिक धोकादायक
कचरा जाळल्यामुळे त्यातून निघणारे क्लोरिनेटेड, कार्बनचे घटक धुराच्या माध्यमातून श्वसनाद्वारे थेट फुप्फुसामध्ये जाऊन अडकतात. त्यामुळे फुप्फुसाच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो. कार्बनच्या घटकामुळे कर्करोग होण्याची शक्यताही अधिक वाढते. सकाळी कचरा जाळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातच सकाळी शुद्ध हवा असते मात्र, प्लास्टिक कचरा जाळल्याने हवा दूषित होऊन त्याचा परिणाम सर्वात जास्त बालकांवर होत असतो. त्यांना लहान वयात श्वसनाचा त्रास सुरू होण्याची भीती असते.
"प्लास्टिक जाळल्यामुळे सर्वांत जास्त परिणाम मानवी शरीरावर होतो. फुप्फुसांवर प्रभाव पडून श्वसनाचे आजार उद्भवतात. बालकांसह मोठ्यांना श्वसनाचा त्रास होतो. मानवी त्वचेवरही प्लास्टिकचा प्रभाव होऊन विविध प्रकारचे आजार होतात. या धुराच्या संपर्कात नेहमी आल्याने कर्करोग होण्याचा धोका आहे. तसेच नागरिकांना श्वसनाचे विकार होऊन पुढे कर्करोग होण्याचा धोका आहे. नागरिकांनी घरासमोर किंवा इतर कुठेही कचरा जाळू नये."
- डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी