पावसाचा अन् नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो काय रे भाऊ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:35+5:302021-08-02T04:10:35+5:30
गोंदिया : यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांच्या काळजीत भर ...
गोंदिया : यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांच्या काळजीत भर घातली. जुलै महिना संपला तरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात केवळ ३५ टक्केच पाणीसाठा आहे. धरण आणि मोठ्या सिंचन प्रकल्पांनी अजूनही ५० टक्क्याची पातळी गाठलेली नाही. त्यामुळे याचा काही प्रमाणात पाणीपुरवठ्यावरसुध्दा परिणाम होतो. गोंदिया शहराला डांगोर्ली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहरवासीयांना दोन पाळीत पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी वैनगंगा नदीचे पात्र लवकरच कोरडे पडल्याने पुजारीटोला धरणातून पाणी सोडून गोंदिया शहरवासीयांना पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र तेव्हा धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा होता. यंदा ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली तरी मोठी धरणे आणि सिंचन प्रकल्पात केवळ ३५ टक्के साठा असल्याने ही स्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच पावसाचा आणि नळाला येणाऱ्या पाण्याचा बराच संबंध येतो.
................
धरणातील पाणीसाठा
प्रकल्प संख्या उपयुक्त टक्केवारी
मोठे ४ २५.०० ३५.१०
मध्यम ९ २१.३६३ दलघमी २१.४२ टक्के
लघु २२ १०.३४० १४.९८ टक्के
....................
बळीराजा आनंदला.....
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला असून आता आमची रोवणी आटोपत आली आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीला थोडा विलंब झाला होता. पण आता स्थिती ठीक आहे.
- विनोद बिसेन, शेतकरी
............
यंदा सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने काहीशी चिंता वाढविली होती. पण मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे रोवणी करण्यास मदत झाली.
- दिलीपसिंह गहरवार, शेतकरी
...................
शहराला होतोय नियमित पाणीपुरवठा
- गोंदिया शहराला डांगोर्ली येथे वैनगंगा नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत दोन वेळेस पुरेसा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
- यंदा सुरुवातीपासूनच शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागले नाही.
- पुजारीटोला धरणातसुध्दा पुरेसा पाणीसाठा असल्याने समस्या निर्माण झाली नाही.
................
शहरवासीय म्हणतात नळाला येतेय पुरेसे पाणी
यंदा आतापर्यंत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे दोन पाळीत पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईची कुठलीच समस्या नाही.
- राधेश्याम आगलावे
...............
पाणीपुरवठ्याची समस्या नाही, मात्र काही ठिकाणी पाइपलाइन लिकेज असल्याने गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या आहे. सध्या दोन पाणी पाळीत पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे.
- अतुल बारसागडे
..............
जिल्ह्यात झालेला पाऊस
तालुका अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी
गोंदिया १२०८.७ मिमी ५५६.६ मिमी ४६ टक्के
आमगाव १४२५.६ मिमी ४६०.८ मिमी ३२.३ टक्के
तिरोडा ११५१.६ मिमी ५८०.६ मिमी ५०.४ टक्के
गोरेगाव १०२५.९ मिमी ५५८ मिमी ५४.४ टक्के
सालेकसा ११५८ मिमी ४८२.३ मिमी ४१.६ टक्के
देवरी १२९१ मिमी ५२१.४ मिमी ४०.४ टक्के
अर्जुनी मो. १३६१.१ मिमी ६३४.४ मिमी ४८.४ टक्के
सडक अ. १३३०.९ मिमी ४८६ मिमी ३६.६ टक्के
..............................................................................................