जिल्ह्यात यंदा ज्वारीचा बोलबाला; सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त लागवड

By कपिल केकत | Published: December 14, 2023 08:05 PM2023-12-14T20:05:48+5:302023-12-14T20:08:28+5:30

शेतकऱ्यांची गव्हाला बगल

Dominance of sorghum in the district this year; Cultivation more than general area | जिल्ह्यात यंदा ज्वारीचा बोलबाला; सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त लागवड

जिल्ह्यात यंदा ज्वारीचा बोलबाला; सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त लागवड

कपिल केकत, गोंदिया: जिल्ह्यात धान व दुसऱ्या क्रमांकावर गहू हाच पॅटर्न चालत आला असून, शेतकरी अन्य पिकांकडे वळताना दिसत नव्हता. मात्र, आता धान शेती धोक्याची झाली असल्याने शेतकरी त्याला पर्याय म्हणून अन्य पिकांकडे आकर्षित होत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गव्हाला बगल देत यंदा ज्वारी हाती घेतल्याचे दिसत आहे. यंदा सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड केली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी फक्त धान शेतीलाच प्राधान्य देतो. आजही बहुतांश शेतकरी धान लागवडच करीत असून, दोन्ही हंगामात त्यांना धान लावायचे हे ठरवूनच ठेवले आहे. मात्र, धान शेती नेहमीच धोक्याची राहिली असल्याचा इतिहास चालत आला आहे. हेच कारण आहे की, आजपर्यंत येथील शेतकरी समृद्ध झाला नाही. निसर्ग नेहमीच शेतकऱ्यांना झोडपून काढत आला आहे. यंदाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून नेला आहे. वारंवारचा हा धोका बघता शेतकऱ्यांनी अन्य नगदी पिकांकडेही वळावे यासाठी कृषी विभागाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत.

याचा काही प्रमाणात फायदा आता दिसून येत आहे. कारण, जिल्ह्यातला शेतकरी आता धानासोबतच अन्य पिकांकडे वळताना दिसत आहे. या रब्बी हंगामातच त्याची प्रचिती येत असून, फक्त धान आणि गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा गव्हाला बगल दिल्याचे दिसत आहे. यंदा जिल्ह्यात २२३२.०७ हेक्टर गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यातील ५३३.१० हेक्टरमध्येच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणी केली आहे, तर ज्वारीचे ४३५.६० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, शेतकऱ्यांनी चक्क ५३५.८९ हेक्टरमध्ये ज्वारीची प्रत्यक्ष पेरणी केली आहे. यावरून यंदा जिल्ह्यात ज्वारीचाच बोलबाला दिसून येत आहे.

यामुळे ज्वारीला मागणी

ज्वारीमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, फॅच आणि अँटी ऑक्टीडंट तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे ज्वारी खाल्ल्याने हाडांना मजबुती मिळते, ज्वारी लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते, मधुमेहात ज्वारी फायदेशीर ठरते. तसेच त्वचेच्या कर्करोगापासून ज्वारीमुळे बचाव होतो. हेच कारण आहे की, ज्वारीला प्रचंड मागणी आहे.

गोंदिया तालुक्यात सर्वाधिक लागवड

यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात सर्वाधिक लागवड करण्यात आल्याचे दिसते. गोंदिया तालुक्यात ज्वारीचे ५९.४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असतानाच १३० हेक्टरमध्ये लागवड़ करण्यात आली आहे. त्यानंतर गोरेगाव तालुक्यात ४९.४० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, १२७.९० हेक्टरमध्ये, अर्जुनी- मोरगाव तालुक्यात ५५.२० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, तेथे ११७ हेक्टरमध्ये तर देवरी तालुक्यात ६७.६४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, ९८ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे.

तालुकानिहाय ज्वारी लागवडीचा तक्ता

तालुका - स.सा.क्षेत्र- प्र.पे.क्षेत्र

  • गोंदिया- ५९.४८- १३०
  • गोरेगाव- ४९.४०-१२७.९०
  • तिरोडा- ८७.८४-३६.७०
  • अर्जुनी-मोरगाव- ५५.२०-११७
  • देवरी- ६७.६४-९८
  • आमगाव- ४३.०४-७.१०
  • सालेकसा - ४४.६०-१९.१९
  • सडक-अर्जुनी- ५६-००

Web Title: Dominance of sorghum in the district this year; Cultivation more than general area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.