सामाजिक दायित्वाची भावना मनात ठेवून रक्तदान करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:19+5:302021-07-18T04:21:19+5:30
केशोरी : ‘लोकमत’ परिवाराने हाती घेतलेल्या संकल्पाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रक्तदान हा सामाजिक बांधिलकीचा सोहळा असून, यामध्ये ...
केशोरी : ‘लोकमत’ परिवाराने हाती घेतलेल्या संकल्पाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रक्तदान हा सामाजिक बांधिलकीचा सोहळा असून, यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सामाजिक दायित्वाची भावना मनात ठेवून रक्तदान करावे, असे प्रतिपादन सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी केले.
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या वतीने स्वातंत्र्य संग्रामसेनानी व ‘लोकमत’ वृत्तपत्राचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन ठाणेदार संदीप इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, जिल्हा युवक राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योगेश नाकाडे, शिवसेना तालुकाप्रमुख चेतन दहीकर, शिवसेना युवक तालुकाप्रमुख अभिजित मशीद, उपसरपंच रामकृष्ण बनकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. ठाणेदार इंगळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडल यांनी लोकमतच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर लोकमत परिवाराकडून उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडल आणि लोकमतचे वाचक प्रदीप शेंडे या दोघांचा योगायोगाने आलेला जन्मदिवस केक कापून साजरा करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने ठाणेदार इंगळे, डॉ. मंडल, रॉ. राकेश पेशने, डॉ. पराग विजराव सार्वे (मुंबई), रजनी झोडे, नूतन चेटुले, गुणेश काडगाये, योगेश नाकाडे, अभिजित मशीद, नितीन लंजे, प्रदीप शेंडे, सुनील शेंडे, नरेंद्र गोस्वामी, राकेश वलथरे यांच्यासह इतर १५ अशा एकूण ३८ दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात गोंदिया येथील शासकीय गंगाबाई स्त्री रुग्णालयातील पथकाने रक्तसंकलनाचे कार्य केले. शिबिरासाठी ‘लोकमत’ तालुका प्रतिनिधी संतोष बुकावन, राधेश्याम भेंडारकर, केशोरी प्रतिनिधी चरण चेटुले, लोकमत समाचार प्रतिनिधी प्रकाश वलथरे, श्रीकांत पिल्लेवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.