सायन्ससाठी डोनेशन, कलासाठी आॅफर्स
By admin | Published: July 9, 2015 01:22 AM2015-07-09T01:22:27+5:302015-07-09T01:22:27+5:30
दहावीच्या निकालानंतर अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली.
शिक्षणाचे बाजारीकरण : गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना बसतोय फटका
गोंदिया : दहावीच्या निकालानंतर अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली. परंतू ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे हव्या त्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे अशक्य होत आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे गरीब असो की गुणवंत, खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘डोनेशन’ दिल्याशिवाय प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. तर कला शाखेच्या तुकड्या चालविण्यासाठी विद्यार्थी मिळत नसल्याने काही महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्याना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आकर्षक आॅफर्स दिल्या जात आहेत.
विज्ञान शाखेत नाव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद किंवा नगरपरिषदेच्या शाळांची वाट धरावी लागणार आहे.
जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणाऱ्या २५४ शाळा अनुदानित आहेत. या अनुदानित शाळांमध्ये ३१६ तुकड्या आहेत. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय तिरोडा तालुक्यात ३१, आमगाव तालुक्यात २२, सालेकसा तालुक्यात २०, देवरी तालुक्यात ३१, सडक/अर्जुनी तालुक्यात २६, अर्जुनी/मोरगाव तालुक्यात ४०, गोरेगाव तालुक्यात २३ व गोंदिया तालुक्यात ६१ आहेत. या सर्व शाळांमध्ये अकरावीला प्रवेश देणाऱ्या तुकड्या ३१६ आहेत. यात कला शाखेच्या १९१ तुकड्या, विज्ञान शाखेच्या १०२ तुकड्या, वाणिज्य शाखेच्या १६ तुकड्या तर संयुक्त शाखांच्या सात तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये ^६० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो.
जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशाची एकूण क्षमता २१ हजार ४८० विद्यार्थ्यांची आहे. अकरावीच्या जागा उपलब्ध आहेत. तरीदेखील खासगी आणि नावाजलेल्या शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवत्तेऐवजी ‘डोनेशन’ हाच निकष अनेक ठिकाणी लावल्या जात आहे. यातून गोरगरीब विद्यार्थ्यांना इच्छा असूनही त्या शाळांमध्ये प्रवेश घेणे अशक्य होत आहे. विज्ञान शाखेच्या १०२ तुकड्यांमध्ये सात हजार विद्यार्थी, वाणिज्य शाखेच्या १६ तुकड्यांमध्ये ६२५ विद्यार्थी, कला शाखेच्या १९१ तुकड्यांमध्ये १० हजार ८०० विद्यार्थी तर संयुक्त शाखेच्या सात तुकड्यांमध्ये ४९० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
विज्ञान शाखेच्या १०२ तुकड्यांसाठी १० हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजन आहे. मात्र प्रत्यक्षात दोन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन शकणार नाही. याचाच फायदा घेत अनेक अनुदानित शाळांमध्ये प्रवेश शुल्काच्या नावावर आर्थिक शोषण केले जात आहे. चांगले गुण घेऊनही एखाद्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला त्या शाळेत केवळ डोनेशन देण्याची तयारी नाही म्हणून प्रवेश दिला जात नाही. अनुदानित असलेल्या काही शाळांनी विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. पालक वर्ग हा अन्याय मुकाट्याने सहन करीत आहे. आपल्या मुलाला गावाच्या परिसरातील किंवा नजीकच्या गावातील शाळेत प्रवेश मिळावा हा पालकांचा उद्देश असतो. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी रक्कम पालकांना मोजावी लागत आहे. प्रवेश शुल्क परीक्षेसाठी प्राचार्य व शिक्षकांशी बाचाबाची केली तर प्रवेश मिळाल्यानंतरही आपल्या पाल्याचे गुण कमी करून त्याला नापास करण्याचा प्रयत्न तेथील मुख्याध्यापक करतील अशी धारणा ठेवून या आर्थिक शोषणाविरूध्द पालक आवाज उठवित नाहीत. याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये अकरावीत प्रवेश देतांना प्रवेश शुल्काच्या नावावर पालकांच्या खिशातून पाच ते ३० हजाराची रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याने हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
तर कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे महाविद्यालयांकडून आपापल्या परीने आफर्स देऊन आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून शिक्षणाचे खरोखरच बाजारीकरण झाल्याचे चित्र उभे होत आहे. महाविद्यालयांची वाढलेली संख्या आणि शिक्षकांची संख्या टिकवून ठेवण्यासासाठी महाविद्यालय प्रशासनाला ही कसरत करावी लागत आहे. एकीकडे आॅफर्स दिल्या जातात तर दुसरीकडे हळूच या ना त्या निमित्ताने डोनेशनसुद्धा उकळण्याचा प्रयत्न काही महाविद्यालये करीत आहेत.फक्त विद्यार्थी मिळावे यासाठी सुरू असलेली शाळा व महाविद्यालयांची धडपड केवीलवानी ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)