कानातल्या बुरशीला घाबरू नका, पण काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:25+5:302021-06-25T04:21:25+5:30
गोंदिया : कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांना मध्यंतरी म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले होते. अत्यंत गंभीर असा हा बुरशीचा ...
गोंदिया : कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांना मध्यंतरी म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले होते. अत्यंत गंभीर असा हा बुरशीचा प्रकार असल्याने सर्वांनाच धडकी भरली होती. मात्र या आजाराचे प्रमाण आटोक्यात आले असतानाच आता कानातल्या बुरशीच्या तक्रारी वाढल्या आहेत. कान-नाक-घसा तज्ज्ञ याला ‘ओटोमायकोसिस’ असे म्हणतात. पावसाळ्यात बुरशीमुळे हा आजार जास्त प्रमाणात उद्भवत असून त्यातही मधुमेह असलेल्या व्यक्तींना होण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय गर्भवती महिलांना सतत कानाला रुमाल बांधून ठेवणे किंवा कानात कापसाचे बोळे टाकून ठेवणे यामुळेही हा आजार होत असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय भगत यांनी सांगीतले. कानातील बुरशी हा सामान्य आजार असून यापासून घाबरण्याची गरज नाही. मात्र कोणत्याही बुरशीवर वेळीच उपचार गरजेचा असल्याने काळजी घेण्याची गरज असल्याचेही डॉ. भगत यांनी सांगितले.
----------------------------------
कशामुळे होते बुरशी
गर्भवती महिलांचे कान जास्त दिवस बंद ठेवले जातात व अशात कानात बुरशी होण्याची शक्यता बळावते. याशिवाय मधुमेह असलेल्या व्यक्तींना कानातील बुरशी होण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे, कानाला काहीही करण्याची गरज नाही. मात्र तरीही कान ओले असल्यास हेडफोन वापरत असल्यास हा आजार होऊ शकतो. कान खाजवणे, पस येणे व कान दुखणे अशा तक्रारी असल्यास मात्र आपल्या डॉक्टरांशी लगेच संपर्क साधावा.
---------------------------
काय काळजी घ्यावी
कानाला विशेषत: काहीच करण्याची गरज नसते. मात्र तरिही पावसाळ्यात कानातल्या बुरशीच्या तक्रारी वाढतात. अशात कानात कोणतीही टोकदार वस्तू किंवा इअर बड टाकून स्वच्छ करू नये. यामुळे आणखी अन्य तक्रारी निर्माण होता. तसेच हेडफोन वापरत असल्यास त्याला वारंवार निर्जंतुक करावे. कान स्वच्छ करण्यासाठी आपल्या डॉक्टरांशीच संपर्क साधावा.
----------------------------
कोट
कानातली बुरशी हा प्रकार पावसाळ्यात जास्त प्रमाणात उद्भवतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींना याची जास्त शक्यता असते. यामुळे कानात खाज येणे, पस वाहने किंवा कान दुखत असल्यास कोणत्याही टोकदार वस्तू किंवा इअर बडने स्वच्छ करू नये. कानात बुरशीचे निदान करून ती काढावी लागते व औषधोपचार करावा लागतो. यामुळे घाबरू नका मात्र काळजी घ्या व डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- डॉ. संजय भगत, कान-नाक-घसा तज्ज्ञ, गोंदिया.
----------------
पावसाळ्याच्या दिवसांत कानात बुरशी होण्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात होतात. अशात पावसात भिजणे टाळावे. तसेच कान ओले होऊ देऊ नये व ओले झाल्यास लगेच पुसून कोरडे करावे. कानातल्या बुरशीत सुरुवातीला कान बंद होतो व त्यानंतर दुखणे सुरू होते. अशात बुरशी काढावी लागते व औषधोपचार करावा लागतो. त्यामुळे दुर्लक्ष न करता लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
- डॉ. लता जैन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, गोंदिया