शेतकरी नवरा नको गं बाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:57+5:302021-03-21T04:27:57+5:30
गोंदिया : सुखी संसाराच्या स्वप्नांना आता ग्रहण लागत आहे. मुलींकडील मंडळींची अपेक्षा मुलाकडून मोठ्या प्रमाणात असल्याने चांगल्या-चांगल्या मुलांना मुली ...
गोंदिया : सुखी संसाराच्या स्वप्नांना आता ग्रहण लागत आहे. मुलींकडील मंडळींची अपेक्षा मुलाकडून मोठ्या प्रमाणात असल्याने चांगल्या-चांगल्या मुलांना मुली मिळणे कठिण झाले आहे. शिकून मोठे झालेल्या मुलांच्या हातात नोकरी नसल्याने ते लग्न करू शकत नाही. नोकरी नाही तर छोकरी नाही अशी स्थीती गोंदिया जिल्ह्यात आहे. शेतकरी मुलाला मुलींची नापसंती आहे.
पोट भरण्यासाठी शेतीला व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकरी पोराला कुणीच विचारत नसल्याची खंत तरूण शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाली. डॉक्टर, नोकरपेशा यांना मोठ्या प्रमाणात पसंती आहे. त्यातही डॉक्टर एमबीबीएस असायला हवा असाच समज समाजात दृढ झाला आहे. व्यावसायिकाला ना पसंती ना नकार दिला जातो. परंतु शेतकरी मुलाला सरळ नकारच दिला जात आहे. त्यामुळे अनेक मुलांचे लग्न होत नाही. मुलींचा जन्मदर घटल्याने मुलांना मुली मिळणे कठिण झाले आहे.
.......
मुलींकडून ठेवल्या जातात अट
लग्नानंतरी नवऱ्याने सोबत ठेवायला हवे, नवरा शहराच्या ठिकाणी असावा, आईवडीलांपासून दूर असावा. नोकरीच्या ठिकाणी नवऱ्या मुलीला न्यावे, शिकण्याची इच्छा असेल तर शिकू द्यावे, नोकरी करण्याची इच्छा मुलीची झाली तर नोकरी करू देण्यास मुलगा तयार असावा अश्या विविध अटी मुलांकडे मुलींकडील मंडळी ठेवत आहेत.
........
सर्वाधिक मागणी एमबीबीएस डॉक्टरांना
१) मुलगा लग्नासाठी पाहात असताना मुलगा डॉक्टर असावा पण त्यातही तो एमबीबीएस डॉक्टर असावा अशी मुलीकडील मंडळींची अपेक्षा असते.
२) मुलगा नोकरीवर असावा, व्यसनी नसावा, शहाराच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास अधिक पसंती दर्शविली जाते. नोकरीसाठी बाहेर असलेल्या मुलासाठी वशीला लावला जातो. माझी मुलगी नोकरीदार मुलासोबतच सुखी राहू शकते ही आईवडीलांची धारणा झाली आहे.
३) छोटे कुटुंब असलेल्या मुलांनाही पसंती दिली जाते. संयुक्त कुटुंबातील नोकरीवर असलेल्या कुटुंबातील मुलांनाही मुली नाकारत आहेत.
...........
मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. ज्या मुलींचे शिक्षण १२ वी असेल त्या मुलीसाठीही वडील नोकरीवाला मुलगा असावा असे म्हणतो. आपल्या मुलीची योग्यता पाहून वर पाहायला हवे. परंतु मुलीची योग्यता न पाहता मुलाच्या योग्यतेकडे वधूपिता पाहात असल्याने समाजाचे समतोल ढासळत आहे.
- सखाराम मेंढे, वरपिता
...............
आपल्या मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवित असतांना त्या मुलासोबत आपल्या मुलीचा संसार सुखी राहील किंवा नाही याची शहानिशा करूनच स्थळ शोधणे गरजेचे आहे. अनेक मुल लग्न जोडण्यासाठी खोटी माहिती देऊन मुलींची फसवणूक करतात. लग्न जुळल्यानंतर काही दिवसात त्यांची वास्तविकता समोर आल्यास लग्न मोडले जाते.
- नारायण कारंजेकर, वधूपिता
........
आजच्या मुलामुलींमध्ये संयम नसल्यामुळे लग्नानंतरही ते कुटुंब चालवू शकतील किंवा नाही हे निश्चीत राहात नाही. दोन्ही पक्ष एकमेकाला समजून घेत नसल्यामुळे अनेक लग्न मोडतात. त्यात लग्न जोडणाऱ्यांनाच दोष दिला जातो त्यामुळे लग्न जोडण्यास कुणी पुढाकार घेत नाही.
- लक्ष्मण काटेखाये, पदमपूर
........
- मुला-मुलीतील गुणसूत्र जुळविण्यापेक्षा त्यांचे मन जुळले पाहिजेत यासाठी आज प्रयत्न करावे लागतात. नुसते नोकरीपेशाकडेच मुलीकडील मंडळींचा कल असणे योग्य नाही. मग ज्यांना नोकरी नाही त्यांनी अविवाहित राहावे काय? तडजोड करून संसार चालवण्यात गोडी असते.
- सुनिल तरोणे, सावरटोला अर्जुनी-मोरगाव
......
मुलामुलींची लग्न जोडण्यात खूप कसरत होत आहे. एखाद्याचे लग्न जुळले आणि ते काही कारणास्तव ते मोडण्यावर आले त्यावेळी सर्व खापर लग्न जोडणाऱ्यावर फोडले जाते. परंतु ज्यांचे वैवाहिक जीवन सुखमय चालत आहे ती जोडपी त्या लग्न जोडणाऱ्याचे नावही काढत नाही. भांडण झाल्यास लग्न जोडणाऱ्यांवर हुंडाबंदी कायद्यात अडकण्याची भिती व्यकञत होत असल्याने कुणी मधात पडायला पाहात नाही.
-भरत चुटे, आमगाव
.....