कोरोनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:00 AM2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:08+5:30
बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणामुळे प्राणी जगतातील सुक्ष्मजीव मानवात प्रवेश करतात. कोरोना हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून बाहेर पडतो. याशिवाय शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठ भागावर पडतात. अशा पृष्ठाभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक, चोळण्याच्या सवयीमुळे देखील हा आजार पसरू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे चुकीचे, भीती पसरविणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत. तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला १०४ वर फोन करून शंका निरसन करून घ्यावे, असे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी लोकमतला सांगितले.
कोरोना हे विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. २००३ मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुध्दा कोरोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकात जो कोरोना विषाणू आढळला. तो विषाणू यापूर्वीच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना असे संबोधण्यात येते.जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास ‘कोवीड-१९’ असे नाव दिले आहे. कोरोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळात आढळतो.
बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणामुळे प्राणी जगतातील सुक्ष्मजीव मानवात प्रवेश करतात. कोरोना हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून बाहेर पडतो. याशिवाय शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठ भागावर पडतात. अशा पृष्ठाभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक, चोळण्याच्या सवयीमुळे देखील हा आजार पसरू शकतो. करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही.
रूग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. कोरोनाची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडीत असतात. ही सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, न्युमोनिया,काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.बाधीत देशातून आलेल्या प्रवाश्यांचा पाठपुरावा,आपले हात वारंवार धुवावेत. निकटचा संपर्क टाळावा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावेत. उघड्यावर थुंकू नये असा सल्ला डॉ.नितीन कापसे यांनी दिला आहे.
अशी घ्यावी काळजी
कोरोना किंवा श्वसनावाटे पसरणाऱ्या स्वाईन फ्लू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी श्वसनसंस्थेचे विकार असणाºया व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे,हात वारंवार धुणे,शिंकताना,खोकतांना नाका-तोंडावर रूमाल अथवा टिशू पेपर धरावे. अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये, फळेभाज्या न धुता खाऊ नये.
यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
ताप, खोकला, श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्ती
हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्याने व रूग्णाने कोरोनाबाधित देशात प्रवास केला असता.
प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवेश केला आहे.