यापुढे रस्त्यांवर कुणाचेही सामान नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 05:00 AM2022-03-09T05:00:00+5:302022-03-09T05:00:26+5:30
शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर ठेवत असल्याने वाहनांना जागा उरत नसून ते रस्त्यावर येतात. अशात वाहतुकीची कोंडी होत असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो; मात्र आता यापुढे कुणाचेही सामान रस्त्यावर असल्यास जप्त केले जाणार आहे. यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून वाहतूक नियंत्रण शाखा व नगर परिषदेने मंगळवारपासून (दि.८) संयुक्तरित्या मोहीम राबविली.
शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्यास ते रस्त्यावरच वाहन ठेवतात. अख्ख्या बाजारातच हा प्रकार सुरू असून बाजारात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी जागोजागी ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबतच्या तक्रारी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यापर्यंत गेल्या असून त्यांनाही असाच अनुभव आला आहे. यावर त्यांनी मंगळवारी (दि.८) वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे, शहर ठाणेदार महेश बनसोडे, नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता अनिल दाते, रवींद्र कावडे यांच्यासोबत बाजारात पाहणी करून रस्ते मोकळे करण्यासाठी मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार, मंगळवारी (दि.८) बाजारात मोहीम राबवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानदारांनी ठेवलेले सामान त्यांना उचलण्यास सांगितले.
अन्यथा सामान केले जाणार जप्त
- दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवणे हा नित्याचाच प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी अधिकाऱ्यांनी मोहीम राबविल्यानंतर काही दुकानदारांनी त्यांचे बोर्ड रस्त्यावर आणून ठेवल्याचे दिसले; मात्र आता ही मोहीम सातत्याने राबविली जाणार असून कुणाचेही सामान रस्त्यावर दिसून आल्यास मात्र काहीही न सांगता ते जप्त केले जाणार आहे. यामुळे आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवणे त्यांच्यासाठीच नुकसानीचे ठरणार आहे.
बाजारातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. अशात दुकानदार त्यावर सामान ठेवत असल्याने वाहतुकीला अडचण होते; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान न ठेवता सहकार्य करावे. अन्यथा त्यांचे सामान जप्त केले जाणार.
- दिनेश तायडे
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा
दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवले जात असल्याने वाहनचालकांना जागा मिळत नाही व ते रस्त्यावर वाहन ठेवतात. यामुळे वाहतुकीला अडचण होते व नागरिकांना त्रास होतो; मात्र आता दुकानदारांनी रस्त्यावर सामान ठेवू नये.
- करण चव्हाण
मुख्याधिकारी, नगर परिषद